मल्ल्यासारखं बँकेला फसवायला गेला, पण पोलिसांच्या तावडीत सापडला


मल्ल्यासारखं बँकेला फसवायला गेला, पण पोलिसांच्या तावडीत सापडला
SHARES

विजय मल्ल्या बँकेला फसवू शकतो, तर आपण का नाही? असं म्हणत नवीन गाडी घेण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे बँकेकडून कर्ज घेणाऱ्या आरोपीला कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी देना बँकेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार बिपीन अलविला आणि संजय कदम यांच्या विरोधात कुर्ला पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी बिपीनला बेड्या ठोकल्या असून संजयचा पोलिस शोध घेत आहेत.


मित्राने दिली कल्पना

कुर्ला परिसरात राहणाऱ्या बिपीन यांना नवीन कार खरेदी करायची होती. मात्र त्यांच्याकडे योग्य कागदपत्रे नसल्याने त्यांना कारसाठी कर्ज मिळत नव्हतं. ही अडचण बिपीन यांनी संजय यांना सांगितली. त्यावेळी संजयने बिपीनला खोटी कागदपत्रे बनवून बँकेतून कर्ज मिळवण्याची कल्पना दिली.

त्यासाठी सुरूवातीला बिपीन तयार नव्हता. मात्र मद्यसम्राट विजय मल्याचं उदाहरण देत संजयने बिपीनला या फसवणुकीसाठी तयार केलं. बिपीनने कुर्ला पूर्वेकडील देना बँकेत खातं उघडलं. त्याकरीता त्याने आपण अंधरीतील एका नामांकित कंपनीत कामाला असल्याचं दाखवलं.


बनावट कंपनी

याच कंपनीची बनावट पगाराची स्लीप दाखवून त्याने देना बँकेकडून ९.९ लाख रुपयांचं कर्ज घेतलं. सुरूवातीला त्याने कारचे दोन महिन्यांचे हप्ते भरले. मात्र त्यानंतर त्याने पैसेच भरले नाहीत. याबाबत बँकेने वारंवार त्याच्याशी पत्रव्यवहारही केला. मात्र बिपीन काहीच उत्तर देत नव्हता. अखेर बँकेने बिपीनला कर्जावर घेतलेली कार बँकेकडे जमा करण्यास सांगितली.


दुसरीच कार जमा

त्यानुसार बिपीनने ती कार बँकेकडे जमा करण्याऐवजी त्याच रंगाची दुसरी गाडी बँकेकडे जमा करून पळ काढला. बँकेने केलेल्या चौकशीत बिपीनने दुसरी कार जमा केल्याचं बँक मेनेजरच्या लक्षात आल्यावर मॅनेजरने कुर्ला पोलिस ठाण्यात बिपीन विरोधात गुन्हा नोंदवला. तपासादरम्यान पोलिस जेव्हा बिपीनने दिलेल्या कामाच्या पत्त्यावर पोहोचले, तेव्हा तिथं असा कुठलाही व्यक्ती कामाला नसल्याचं कंपनीने सांगितलं.


पोलिसांच्या तावडीत

अखेर पोलिसांनी बिपीनचे मोबाइल नेटवर्क आणि सीसीटिव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या मदतीने बिपीनच्या मुसक्या आवळल्या. मात्र बिपीनला बनावट कागदपत्रे बनवण्यात मदत करणारा संजय अजून फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. न्यायालयाने बिपीनला ३१ मार्चपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा-

सावधान! मुंबईत 'टक टक गँग' सक्रिय

'ऑईल' माफियांचा पर्दाफाश, टँकरखाली पाईप लावून करायचे चोरी!



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा