'ऑईल' माफियांचा पर्दाफाश, टँकरखाली पाईप लावून करायचे चोरी!

ऑईलने भरलेले ट्रक बाहेर आल्यानंतर हे माफिया पहिल्यांदा यू आकारातील पाईपमधील ऑईल काढून घ्यायचे. त्यानंतर मुख्य टाकीतील ऑईल काढायचे.

'ऑईल' माफियांचा पर्दाफाश, टँकरखाली पाईप लावून करायचे चोरी!
SHARES

इंधनाच्या किंमतींनी उच्चांक गाठला असताना, संधीचा फायदा घेत शिवडीच्या आईल टँकरमधून इंधन चोरी करून ते काळ्या बाजारात कमी किंमतीत विकून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या टोळीचा पोर्ट झोनच्या पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार सराईत ऑईल तस्करांना पोलिसांनी पकडले असून सिद्धेश्वर वाघमारे, राजेंद्र तिवारी, नरेंद्र सिंग रावत आणि राजू मुजावर अशी या चौघांची नावे आहेत.


सापळा रचून केली अटक

मुंबईच्या शिवडी परिसरात ऑईल माफियांची ही डील पेट्रोलिअम कंपन्यांच्या बाहेर उभ्या असलेल्या ऑईल टँकरमध्ये व्हायची. अनेकदा या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र पोलिसांना यश मिळत नव्हते. अखेर सोमवारी हे ऑईल माफिया एक मोठी डील करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ऑईल कंपन्यांमधून तेल भरून निघालेले ट्रक जे.एन.पी.टी बंदराच्या दिशेने जात असताना शिवडीच्या अंधाऱ्या रस्त्यावर अचानक थांबले. त्यावेळी हे चारही सराईत आरोपी ऑईल टँकरमधून तेल काढत होते. त्यावेळी पोलिसांनी चौघांना रंगेहाथ पकडले.


अशी करायचे तेलचोरी!

शिवडी परिसरात अनेक ऑईल कंपन्या असल्यामुळे त्यातून बाहेर निघणाऱ्या ट्रकच्या टाकीच्या खाली या चोरट्यांनी मोठा पाईप यू आकारात बसवून घेतला होता. ऑईल भरताना त्या बंद पाईपमध्ये ५० लिटरहून अधिक ऑईल भरले जायचे. त्यानंतर हे ऑईलने भरलेले ट्रक बाहेर आल्यानंतर हे माफिया पहिल्यांदा यू आकारातील पाईपमधील ऑईल काढून घ्यायचे. त्यानंतर मुख्य टाकीतील ऑईल काढायचे. तसेच कंपन्यांमधील सुरक्षा रक्षक ट्रकमधील टाकीतील ऑईलची डेप्थ तपासतील म्हणून हे माफियां ऑईलमध्ये दुसरं तेल टाकून त्यांची डेप्थ भरून काढायचे.


असा व्हायचा व्यवहार

शिवडीच्या पेट्रोलियम कंपनीतून ऑईल भरून निघणाऱ्या ट्रकची कमी नाही. या ट्रकच्या चालकांना पैशांचे आमिष दाखवून हे चोर शेकडो लिटर ऑईल काढायचे. नुकत्याच पोलिसांनी केलेल्या कारवाईत या चोरांनी साठवून ठेवलेला २२ हजार लिटर डिझेलचा साठा जप्त केला आहे. बाजारात डिझेलची किंमत ६७.९१ रुपये असताना हे माफिया चोरलेले डिझेल ६० रुपयांना विकायचे. आठवड्यातून तीन ते चारवेळा हे अशा प्रकारे ऑईल चोरायचे. या आरोपींवर यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात पुढे आले असून त्यांच्या एका साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत.


या पूर्वीच्या घटना

शिवडी परिसरात राहणारा राजू पंडीत हा सराईत आरोपी असून हे तिघेही त्याच्यासाठी काम करायचे. नेहमी येणाऱ्या जहाजांच्या संपर्कात राजू कायम असायचा. पेट्रोल किंवा डिझेल खरेदीसाठी राजू पैसे द्यायचा. या प्रकरणात या तिघांनी राजूचं नाव घेतलं. पोलिस राजूला अटक करायला जाण्याआधीच, आपला या प्रकरणात संबध नसून घटनास्थळीही आपण उपस्थित नसल्याचे सांगत राजूने न्यायालयातून जामीन घेतल्याने तो सुटला. या भागातील पोलिसांची ही दुसरी कारवाई असून या पूर्वीही पोलिसांनी अशा प्रकारे इंधनाची तस्कारी करणाऱ्या संतोष हेन्ड्री आलफेंड डिसोजा, राजेश हरिजन, राकेश चव्हाण, कालूराम गौतम, शंभू उर्फ सुनील कोळी यांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा