तेल माफियांचा पर्दाफाश


तेल माफियांचा पर्दाफाश
SHARES

इंधनांच्या किंमतीने उच्चांक गाठला असताना याच संधीचा फायदा घेत समुद्रातील जहाजांमधून इंधन चोरी करून ते काळ्याबाजारात कमी किंमतीत विकून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या टोळीचा पोर्ट झोनच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी पर्दाफाश केला आहे.

मुंबईच्या यलोगेट परिसरात ऑईल माफियांची ही डिल शहराजवळच्या भूच्चर आयलंड येथे होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. आरोपींची नावे नितीन कोळी, दिपक कोळी, कुणाल म्हेत्रे असं असून हे सर्व जण समुद्रात इंधनवाहू नौकेतून चोरून आणलेले जहाज लाकडी बोटीतून समुद्रकिनारी उतरवण्यासाठी आले होते. याच क्षणी पोलिसांची नजर त्यांच्यावर पडताच त्यांनी बोट पळवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. एका क्षणाला पोलिसांनी त्यांना गाठले देखील. मात्र पोलिसांच्या बोटीला धडक देत हे तेल माफिया पुन्हा पळ काढण्याच्या प्रयत्नात होते. मात्र बोटीत इंधनाने भरलेले ड्रम होते. त्यामुळे बोट पळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिन्ही आरोपींनी चोरलेले इंधन समुद्रात सोडून ड्रम रिकामे करत समुद्रातून ऑईल कंपन्यांच्या रिफायनरी पाईप खालून या माफियांनी पळ काढला. पोलिसांची बोट मोठी असल्यामुळे ते पाठलाग करू शकले नाही.


असा घेतला आरोपींचा शोध

आरोपींचा पाठलाग करत असताना यातील एका पोलिसाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असताना पोलिसांना आरोपी नितीन कोळी, दिपक कोळी, कुणाल म्हेत्रे या तिघांची ओळख पटली. पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळाल्यानंतर हे तिघेही रत्नागिरी, रायगड, नवीमुंबई, गोवा, शेगाव, शिर्डी या ठिकाणी फरार झाले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी हे तिघे शिवडी परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.


असा व्हायचा व्यवहार

मुंबईत परदेशातून येणाऱ्या जहाजांची संख्या मोठी आहे. या जहाजांना चार ते पाच इंजिन असतात. त्यानुसार त्यांना इंधनाचा साठा दिला जातो. मात्र जहाजाचा कॅप्टन अवघ्या अर्ध्या इंजिनवर जहाज मुंबईत आणत असतो. त्यामुळे बंद इंजिनासाठीचे इंधन तो या माफियांना कमी किंमतीत विकायचा. म्हणजेच पेट्रोलचे भाव ८० रुपये असल्यास हे माफिया ५५ रुपयांना इंधन खरेदी करून ते स्थानिक कोळीबांधव किंवा इतरांना ६५ ते ७० रुपयांना विकत असत.


मास्टर माईंड फरार

शिवडी परिसरात राहणारा राजू पंडीत हा सराईत आरोपी असून हे तिघेही त्याच्यासाठी काम करत असत. राजू नेहमी मुंबईत येणाऱ्या जहाजांच्या संपर्कात होता. पेट्रोल किंवा डिझेल खरेदीसाठी राजू पैसे द्यायचा. याप्रकरणी पोलीस राजूला अटक करायला जाणार तोच, आपला या प्रकरणात संबध नसून घटनास्थळीही आपण उपस्थित नसल्याचे सांगत राजूने न्यायालयातून जामीन मिळवल्याने तो सुटला. या भागातील पोलिसांची ही दुसरी कारवाई असून या पूर्वीही पोलिसांनी अशा प्रकारे इंधनाची तस्कारी करणाऱ्या संतोष हेन्ड्री, आलफेंन्ड डिसोझा, राजेश हरिजन, राकेश चव्हाण, कालूराम गौतम, शंभू उर्फ सुनील कोळी यांना काही दिवसांपूर्वीच अटक केली होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा