गजबलेलं दादर स्थानक अन् लाेंबकळणारा मृतदेह


गजबलेलं दादर स्थानक अन् लाेंबकळणारा मृतदेह
SHARES

मुंबईतील सर्वाधिक गजबजलेल्या स्थानकांपैकी एक असलेल्या दादर स्थानकावर एक मृतदेह रात्रभर लोंबकळत होता असं सांगितलं तर कुणालाही आश्चर्य वाटेल. पण दुर्दैवाने हे खरं आहे. स्थानकात नव्यानेच झालेल्या 'स्काय वाॅक'वर गळफास घेतलेल्या अवस्थेतील तरुणाचा मृतदेह गुरूवारी रात्रभर लोंबकळत होता. पहाट झाल्यावर ट्रॅकवर लोंबकळणारा हा मृतदेह पाहून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकरणाचा शिवाजी पार्क पोलिस अधिक तपास करत आहेत.


नेमकं प्रकरण काय?

दिवस असो की रात्र दादर स्थानक कायमच गजबजलेल असतं. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता स्थानकावर जाण्यासाठी रेल्वेरूळ क्राॅस करून, जीव धोक्यात घालणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही दिवसांपूर्वीच स्थानकाला लागून असलेल्या टिळक ब्रिजला जोडणारा एक नवीन 'स्काय वाॅक' बांधण्यात आला आहे. या 'स्काय वाॅक'वरही प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. तरीही गुरूवारी रात्री एका व्यक्तीने 'स्काय वाॅक'च्या लोखंडी खांबाला साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.


कुणाच्या हद्दीत?

रात्रीची वेळ असल्याने लोंबकळणाऱ्या मृतदेहावर कुणाची नजर गेली नाही. पण शुक्रवारी पहाटे 'स्काय वाॅक'वरून प्रवासी स्थानकाच्या दिशेने येऊ लागताच त्यांची नजर या लोंबकळणाऱ्या मृतदेहावर पडली. मृतदेह पाहिल्यानंतर त्यातील काही जणांनी रेल्वे पोलिसांना बोलवलं. मात्र हा मृतदेह पश्चिम आणि सेंट्रल स्थानकाच्या मधल्या भागात लोंबकळत असल्याने पोलिस तासभर हा भाग कुठल्या हद्दीत येतो त्यावर चर्चा करत होते.


अखेर मृतदेह उतरवला

अखेर 'स्काय वाॅक'चा हा भाग शिवाजी पार्क पोलिसांच्या हद्दीत येत असल्याचं स्पष्ट झाल्यावर मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांना बोलवण्यात आलं. मात्र तरीही बराच काळ हा मृतदेह पोलिसांसमोर तसाच लोंबकळत होता. पोलिस आल्यानंतर तासाभराने मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू असल्याचं शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गंगाधर सोनावने यांनी सांगितलं.


आत्महत्येचं कारण काय?

पोलिस चौकशीत आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव महावीर गोसावी असल्याचं पुढे येत आहे. महावीर मूळचा औरंगाबादच्या केळगावचा राहणारा असून ४ वर्षांपूर्वी तो पत्नी आणि दोन मुलांसह मनमाडच्या खासगाव इथं आला होता. व्यवसायाने टेलर असलेल्या महावीरने भाड्याने टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला होता.

त्यातच गावची जत्रा असल्याने महावीर मूल आणि पत्नीला गावी सोडून अचानक मुंबईला आला. मागील ३ दिवसांपासून त्याचा फोन बंद लागत असल्याची माहिती महावीरचा भाऊ संजयने दिली. व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज परत करू न शकल्यामुळे महावीरने ही आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा