मध्यस्थी पडली महागात, आईस्क्रीमचे पैसे देण्यावरून एकाची हत्या

 Sakinaka
मध्यस्थी पडली महागात, आईस्क्रीमचे पैसे देण्यावरून एकाची हत्या
Sakinaka, Mumbai  -  

साकीनाका परिसरात आईस्क्रीमचे पैसे देण्यावरून झालेल्या शुल्लक भांडणात एकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत चौघांना अटक केल्याची माहिती साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी दिली.

रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास साकीनाका परिसरातील यादव नगरमधील साईनाथ डेअरीत मुज्जू, शाहिद आणि दीपक हे तिघेजण आईस्क्रीम घेण्यासाठी गेले. या तिघांनी डेअरीतून आईस्क्रीम घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला. या तिघांकडे दुकानदाराची जुनी उधारीही बाकी होती. त्यामुळे दुकानदार नरपतसिंग राठोड (२४) याने तिघांकडून आईस्क्रीमचे १२५ रुपये मागितले. यावरून हे तिघे राठोडशी हुज्जत घालू लागले.

हे तिघेजण दुकानदारासोबत जोरदारपणे भांडण करत असल्याचे बघून रस्त्यावरून जाणारे मुझम्मिल शेख (४०) नावाचे गृहस्थ या भांडणात पडले. हे तिघे आईस्क्रीमचे पैसे देत नसल्याचे समजताच शेख यांनी मुज्जूच्या कानशिलात लगावली. यानंतर भांडण थांबायच्या ऐवजी आणखीनच भडकले. मुज्जूचा भाऊ मुबीन देखील तिथे आला आणि या सगळ्यांनी मिळून लाठ्या काठ्यानी मुझम्मिल शेख यांना मारहाण केली.

या मारहाणीत मुझम्मिल शेख गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. पण रुग्णालयात पोहचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अब्दुल रफिक नावाच्या इसमाला देखील मारहाण झाली असून त्याच्या तक्रारीवरून हत्येसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी मुज्जू, शाहिद आणि मुबीनसह अन्य एकाला अटक केली आहे. तर सहाजण अद्याप फरार आहेत.


हे देखील वाचा -

प्राध्यापकांना हजारोंचा गंडा घालणारा 'विद्यार्थी'!

Loading Comments