प्राध्यापकांना हजारोंचा गंडा घालणारा 'विद्यार्थी'!

  Mumbai University
  प्राध्यापकांना हजारोंचा गंडा घालणारा 'विद्यार्थी'!
  मुंबई  -  

  ओळखलंत का सर मला? पावसात आला कोणी...मुंबई विद्यापीठातल्या प्राध्यापकांना सध्या कुसुमाग्रजांच्या 'कणा' कवितेतल्या या ओळी आठवत असतील. पण त्याला कारण या प्राध्यापकांचं कविताप्रेम नसून या प्राध्यापकांना गंडा घालणाऱ्या एका भामट्याचा प्रताप आहे!

  उत्तरपत्रिका लवकरात लवकर तपासून निकाल लावण्याची घाई सध्या प्राध्यापकांना झाली आहे. कारण राज्यपालांनी दिलेली 31 जुलैची डेडलाईन पाळायची आहे. पण एकीकडे या गडबडीत आणि तणावाखाली आलेल्या प्राध्यापकांना एक इसम चांगलाच गंडा घालतोय. सांताक्रूझच्या गोळीबार परिसरात राहणारा इश्तियाक सय्यद असं या 31 वर्षीय इसमाचं नाव असून त्याची मोडस ऑपरेंडी ऐकून खुद्द पोलिस सुद्धा थक्क झाले आहेत.


  तो म्हणायचा 'ओळखलंत का सर मला?'

  इश्तियाक सय्यद हा आधी एखाद्या नामांकित कॉलेजात जायचा. तिथे तो आपली ओळख रोहित पितांबर अशी करून द्यायचा. तिथे प्राध्यापकांशी भेटून 'मी तुमचाच माजी विद्यार्थी आहे' असं सांगून तो त्यांच्याशी बोलत असे. आपलं कॉलेजनंतरचं शिक्षण हे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला झाल्याचं सांगून हा इश्तियाक त्यांना बोलण्यात गुंतवत असे. आपण परदेशातील एका मोठ्या बॅंकेत कामाला असून काही दिवसांपूर्वीच मुंबईला आलो असल्याचं त्यांना सांगत असे. त्यानंतर मात्र आपण अडचणीत असून आपली आई आजारी असल्याचं तो प्राध्यापकांना सांगत असे आणि त्यासाठी आपल्याला पैशांची गरज असल्याचं देखील प्राध्यापकांना सांगत असे. आणि त्यांच्याकडून पैसे घेत असे


  'फार पैसे नकोत मला!'

  इश्तियाकची अजून एक बाब पोलिसांना विशेष वाटली. पैशांची गरज असल्याचं सांगून हा इश्तियाक फार नाही, तर 4 ते 5 हजार रुपये मागायचा. आणि त्याच्या भूलथापांना बळी पडून हे प्राध्यापकही त्याला पैसे देत असत. अशाच प्रकारे त्याने आतापर्यंत 15 प्राध्यापकांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे. त्यात सोमय्या कॉलेजमधील महिला प्राध्यापिका, सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नीटी तसेच एस.जे.म. शाळेच्या शिक्षकांचा समावेश आहे.  


  कसा सापडला भामटा!

  शुक्रवारी हा इश्तियाक मुंबई युनिव्हर्सिटीत फसवण्यासाठी नव्या प्राध्यापकाच्या शोधात गेला... तिथल्या बाळकृष्ण भोसले या प्राध्यापकाशी त्यानं ओळख केली. त्यांना देखील इश्तियाकने आपली ओळख रोहित पितांबर अशीच करुन दिली. आपली राम कहाणी सांगून झाल्यावर त्याने प्राध्यापकांकडे सराईतपणे पैशांची मागणी केली. आता मात्र प्राध्यापकांना संशय आला. याला पैसे देण्याआधी त्यांनी नेमका हा आपला विद्यार्थी होता का नव्हता हे बघण्याचं ठरवलं. हा सांगत असलेल्या वर्षाचे त्यांनी रेकॉर्ड्स बघितले, तर त्यात त्यांना याचं नावच सापडलं नाही. आता मात्र त्यांना नेमका प्रकार समजला आणि त्यांनी थेट पोलिसांना बोलावलं. 


  या प्रकरणी आम्ही आरोपीला अटक केली असून त्याने आणखीन किती प्राध्यापकांना फसवलं आहे? याचा आम्ही तपास करत आहोत

  कल्पना गाडेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बीकेसी  हेही वाचा

  सव्वा लाखांना पडला कॉफीचा 'एकच प्याला'


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.