अल्पवयीन मुलाचा आईप्रमाणे माया करणाऱ्या वृद्ध महिलेवर हल्ला


अल्पवयीन मुलाचा आईप्रमाणे माया करणाऱ्या वृद्ध महिलेवर हल्ला
SHARES

फक्त आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून एका अल्पवयीन मुलाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या 70 वर्षांच्या महिलेवर प्राणघातक हल्ला केला आहे. मुंबईतल्या धारावीत ही घटना घडली. या हल्ल्यात 70 वर्षाच्या सविताबेन वारीया गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सायन हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


विशेष म्हणजे, हा मुलगा धारावी येथील 90 फिट रोडवर राहणाऱ्या एका व्यापाऱ्याचा मुलगा आहे. तो नेहमीच त्याच्या शेजारी राहणाऱ्या वारीयांकडे जात असे. त्या मुलाला आई नसली तरी सविताबेन मात्र त्याला नेहमीच मायेने कुरवाळत. त्याला रोज जेवायला देत.

रोजच्याप्रमाणे बुधवारी रात्री 10 च्या सुमारास तो त्यांच्या घरी गेला. मुलाला जेवण आणण्यासाठी सविताबेन स्वयंपाक घरात गेल्या. पण त्यांचे पैशाने भरेलेले पाकीट बाहेरच्या खोलीतच राहीले. हे पाकीट बघताच या मुलाची नियत फिरली आणि त्याने त्यातील पैसे काढून घेतले. आपण पाकीट बाहेरच्या खोलीत विसारल्याचे लक्षात येताच सविताबेन तिथे आल्या. मात्र पाकीट रिकामी पाहून त्या चकीत झाल्या. तो मुलगा तिथेच असल्याने त्यांनी मुलाला पैसे घेतले का? असे विचारले. पण त्याने मात्र नकार दिला.

सविताबेन यांचा त्याच्यावर संशय होता. त्यामुळे त्यांनी 'पैसे परत केले नाही तर, घरच्यांना सांगणार' अशी भीती दाखवली. आता मात्र मुलगा घाबरला आणि त्याने 8000 रुपये परत केले. पण त्याने पूर्ण पैसे दिले नव्हते. त्यामुळे सविताबेन यांनी पूर्ण पैसे देण्यास सांगितले. तरीही मुलगा काही तयार होईना. आता त्याची चोरी पकडली गेली होती. सगळे आपल्या घरच्यांना समजणार या भीतीने मुलाने आधी दरवाजा बंद केला. त्यानंतर बाथरूममध्ये गेला आणि तिथून शॅम्पूची बाटली आणली. त्याने सविताबेन यांना पकडून त्यांच्या तोंडात शॅम्पू ओतला. तो इथेच थांबला नाही तर, त्याने चाकू, धोपटणे, लाठी, कैचीने सविताबेन यांच्यावर वार केले. त्यामुळे सविताबेन मुलाचा प्रतिकार देखील करू शकल्या नाही आणि त्या बेशुद्ध पडल्या. त्याचवेळी मुलाने तेथून पळ काढला.

पण सुदैवाने सविताबेन यांचे पती घरी लवकर आले. आपल्या पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे बघून त्यांना धक्काच बसला. त्यांनी सविताबेन यांना सायन रुग्णालयात नेले. उपचारानंतर काहीवेळाने त्या शुद्धीवर आल्या आणि त्यानी संपूर्ण हकीगत सांगितली असता आरोपी मुलाला शुक्रवारी डोंगरी येथील वेल्फेअर कमिटीसमोर हजर केले. त्यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पण सविताबेन यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे संगितले जात आहे.


हेही वाचा - 

अमेरिकेहून घरी परतलेल्या मुलाला दिसला आईचा सांगाडा

वृद्धेनेच वृद्धेला लुटले


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा