दाऊदला दणका, हसीना पारकरच्या घराची १ कोटी ८० लाखांना विक्री

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहिण हसीना पारकर हिचे नागपाडा येथील गॉर्डन हॉल अपार्टमेंन्टमधील घर अखेर १ कोटी ८० लाख रुपयांना केंद्रीय यंत्रणा तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा (सफेमा)नं विकलं आहे.

SHARE

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिचं नागपाडा येथील गार्डन हॉल अपार्टमेंटमधील घर अखेर १ कोटी ८० लाख रुपयांना केंद्रीय यंत्रणा तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा (सफेमा) ने विकलं आहे. 


नाव गुपीत

मृत्यूआधी हसीना याच फ्लॅटमध्ये राहत होती. तसंच देश सोडून फरार होण्याआधी कुख्यात गुंड दाऊद हा देखील याच फ्लॅटमध्ये राहत होता. २०१४ रोजी हसीना पारकरचा मृत्यू झाला. त्यानंतर धाकटा भाऊ इक्‍बाल कासकर या घरात रहायचा. २०१७ मध्ये खंडणीप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने  इक्‍बाल कासकरला तिथूनच बेड्या ठोकल्या होत्या.

सीबीआयने १९९७ साली दाऊदच्या या घरावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. सफेमाने दाऊदच्या गार्डन हॉल अपार्टमेंटमधील फ्लॅटवर टाच आणल्यानंतर त्याच्या लिलावासाठी २८ मार्चपर्यंत अर्ज मागवले होते. तसंच लिलावासाठी १ कोटी ६९ लाख रुपये किंमत ठरविण्यात आली होती. हसीनाच्या घरासाठी १ कोटी ८० लाखांची बोली लावली. या व्यक्तीचं नाव सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर करण्यात आले नसून त्याने हा फ्लॅट विकत घेतल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


न्यायालयात धाव 

सफेमा कायद्याअन्वये तस्करी व बेकायदेशीर कृत्यातून जमा केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येतो. या कायद्याच्या कलम ६८ फ अंतर्गत तस्कर करणाऱ्या आरोपीच्या नातेवाईकांच्या मालमत्ताही जप्त करण्याची तरतूद आहे. ही यंत्रणा थेट केंद्रीय वित्त मंत्रालयाअंतर्गत कारवाई करते. त्यांना १९९८ मध्ये या मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश देण्यात आले होते. हसीना पारकरच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाने या आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. 


इतर मालमत्तांची विक्री

एप्रिल २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दाऊदच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. दाऊदच्या कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका यावेळी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानुसार या घरावर टाच आणली असून पुढच्या कारवाईनुसार या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यात रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस या मालमत्तांचा देखील सहभाग होता. गेल्या वर्षी सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने सर्वाधिक म्हणजे ११.५८ कोटी रुपयांची बोली लावून या मालमत्तांचा ताबा मिळवला आहे.



हेही वाचा -

मरोळच्या सोसायटीत घुसला बिबट्या, वन विभागाने लावला सापळा

मुंबई सेंट्रल, डोंबिवली, कुर्ला स्थानकातील पूल दुरूस्तीसाठी बंद



संबंधित विषय
ताज्या बातम्या