म्हाडात घर मिळवून देण्याच्या नावाखाली व्यावसायिकाला लाखोंचा गंडा

म्हाडात फ्लॅट देण्याच्या नावाखाली तिघांनी एका व्यावसायिकाला 65 लाखांचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. कौशिक शाह, प्रमोद साळकर आणि निलेश पलंगे, अशी या आरोपींची नावं असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

SHARE

मुंबईत 10 टक्के कोट्यातून मंत्र्यांच्या ओळखीतून म्हाडात फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली तिघांनी एका व्यावसायिकाला 65 लाखांचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. कौशिक शाह, प्रमोद साळकर आणि निलेश पलंगे, अशी या आरोपींची नावं असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.


अशी केली फसवणूक

चांदिवलीच्या म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रकाश राजपूत हे नवीन घराच्या शोधात होते. म्हाडात कमी किंमतीत घर मिळावं, यासाठी त्यांनी म्हाडाच्या सोडतीत अर्जही केला होता. याच दरम्यान या तीन भामट्यांनी प्रकाश यांची माहिती मिळवत त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी तिघांनी प्रकाश यांना मंत्र्यांच्या 10 टक्के कोट्यातील घर मिळवून देण्याचं आमिष दाखवलं.

ऐवढंच नव्हे तर प्रकश यांना विश्वास बसावा याकरता त्यांना वांद्रे कलानगर येथील म्हाडाच्या कार्यालयात बोलवत, प्लँटचा व्यवहार करून देत असल्याचा बनावही केला. प्रकाश यांचा विश्वास संपादन केल्यानंतर या तिघांनी वेगवेगळी कारणं पुढे करत त्यांच्याकडून 65 लाख 38 हजार रुपये उकळले.


अखेर पोलिसांत तक्रार

काही दिवसांनी प्रकाश हे घराचा ताबा घेण्यासाठी पाठपुरावा करू लागले. त्यावेळी त्यांनी या तिन्ही आरोपींशी संपर्क साधला असता सुरुवातीला आरोपी खोटी आश्वासनं देऊ लागले. कालांतराने तिघेही प्रकाश यांना टाळू लागले.

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर प्रकाश यांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान न्यायालयाने या तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिल्यानंतर खेरवाडी पोलिस ठाण्यात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस तपास करत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.


हेही वाचा -

लाल पावडरमधून ड्रग्जची विक्री; तस्करांकडून ड्रग्जचा नवीन प्रकार

संबंधित विषय
ताज्या बातम्या