आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीय.., सचिन वाझेंच्या व्हाॅट्सअॅप स्टेटसने खळबळ

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्या व्हाॅट्सअॅप स्टेटसमध्ये “आता जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आलीय” असा मेसेज ठेवल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीय.., सचिन वाझेंच्या व्हाॅट्सअॅप स्टेटसने खळबळ
SHARES

ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गंंभीर आरोप करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्या व्हाॅट्सअॅप स्टेटसमध्ये “आता जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आलीय” असा मेसेज ठेवल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या सचिन वाझे यांची सरकारने नुकतीच नागरी सुविधा केंद्रात बदली केली आहे.  

" ३ मार्च २००४. सीआयडीमधील काही अधिकाऱ्यांनी मला खोट्या आरोपांखाली अटक केली. या प्रकरणात आत्तापर्यंत काहीच निष्पन्न झालं नाही, तरी अजूनही वाद सुरूच आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार असं दिसत आहे. मला पुन्हा एकदा खोट्या आरोपांखाली अडकवण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये थोडा बदल आहे. आधी हे घडलं तेव्हा माझ्याकडे १७ वर्षांचा कालावधी होता. अपेक्षा होती, धैर्य होतं, आयुष्य आणि नोकरीमधील अनेक वर्ष शिल्लक होती.

मात्र आता माझ्याकडे आयुष्याची पुढील १७ वर्षे शिल्लक नाहीत तसंच नोकरीची एवढी वर्षे आणि अशा पद्धतीने जगण्याचा संयमही नाही. मला वाटतं जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आलीय," असं सचिन वाझे यांनी आपल्या व्हाॅट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटलं आहे. सचिन वाझेंच्या या व्हॉट्सअॅप स्टेटसनंतर चर्चेला उधाण आलं. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना फोन करून स्टेटस हटवण्यास सांगितल्याचं म्हटलं जात आहे. 

हेही वाचा- सचिन वाझे यांना साईड पोस्टिंग, नागरी सुविधा केंद्रात बदली

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी एक स्काॅर्पियो गाडी आढळून आली होती. या गाडीत जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या सापडल्याने देशभरात खळबळ उडाली होती. या स्काॅर्पिओ गाडीचा तपास काढला असता ही गाडी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांची असल्याचं पुढं आलं.

मात्र त्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीच्या जबाबाचा आधार घेत स्काॅर्पियो गाडी प्रकरण आणि हिरेन यांच्या मृत्यूमागे सचिन वाझे यांचाच हात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. एवढंच नाही, तर वाझेंचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी भाजपने सभागृहात लावून धरली. 

अखेर विरोधी पक्षाच्या आक्रमक दबावापुढं झुकून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची बदली गुन्हे शाखेतून नागरी सुविधा केंद्रात केली.

हेही वाचा- मनसुख हिरेन यांची हत्याच, देवेंद्र फडणवीसांनी थेट जबाबच वाचून दाखवला


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा