प्रद्युम्न हत्या प्रकरण, पोलीस हे खबरदारीचे उपाय करणार!


प्रद्युम्न हत्या प्रकरण, पोलीस हे खबरदारीचे उपाय करणार!
SHARES

हरियाणातील रायन शाळेत झालेल्या सात वर्षीय मुलाच्या हत्येनंतर संपूर्ण देशातील वातावरण तापलेले असताना मुंबई पोलिसांनी देखील खबरदारीचे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलीस यावर काम करत असून लवकरच शाळांना नियमावली दिली जाणार असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी सांगितले. शाळांना याआधी देखील नियमावली देण्यात आली असून गुरुग्रामच्या धर्तीवर तिचे पुनरावलोकन करण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यापासून मुंबई पोलीस नवीन नियमावलीवर काम करत असून येत्या काही दिवसांत ही नियमावली शाळांना दिली जाणार आहे. यासाठी शाळा प्रशासन शिक्षक आणि पालक यांच्यासोबतच असोसिएशनची मदत देखील घेतली जाणार आहे. वुमन अॅण्ड चिल्ड्रन प्रोटेक्शनचे डीसीपी या योजनेचे नोडल ऑफिसर असून त्यांच्या देखरेखीखाली ही नियमावली राबवली जाणार आहे.
- दत्ता पडसळगीकर, पोलीस आयुक्त, मुंबई

लहान मुलांसाठी पोलीस दीदी ही आमची योजना अजूनही सुरू असून त्याचे अनेक चांगले परिणाम झाल्याचे आयुक्त म्हणाले. पोलीस दीदीमुळे काही केसेस तर समोर आल्या आहेतच, पण काही वेळा अघटीत प्रकार घडण्यास आळा देखील बसेल असेही पडसळगीकर म्हणाले.


काय आहे पोलीस दीदी?

शाळांमधले वाढते गैरप्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी पोलीस दीदीची संकल्पना सुरू केली. या योजनेत पोलीस स्वतः शाळेत जातात आणि लहान मुलांना गुड टच आणि बॅड टच याबद्दल सांगतात त्यांचबरोबर शॉर्ट फिल्म्स देखील या मुलांना दाखवल्या जातात.

गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेत सात वर्षीय प्रद्युम्न नावाच्या मुलाची स्कूल बसच्या ड्रायव्हरने शाळेतच हत्या केली होती. यावेळी मुलावर लैंगिक अत्याचार करणार असल्याचे कंडक्टरने पोलिसांना सांगितले होते. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून ठिकठिकाणी निदर्शने अजूनही सुरुच आहेत. विशेष म्हणजे या शाळेचे संस्थापक हे मुंबईत रहात असून त्यांना अटक करण्यासाठी हरियाणा पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत.


हेही वाचा -

कांदिवलीतील रायन स्कूलमुळं 'यांच्या' मुलाचं वर्ष वाया

रायन कुटुंबाला आणखीन एक दिवसाचा दिलासा


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा