मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे शुक्रवारी सकाळी टॅकर आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात सजवलेली स्विफ्ट डिझायर जात होती. त्यावेळी एक्सप्रेवर एका वळणावर आँईल टँकर उभा होता. त्यावेळी कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्यावेळी कारची टँकरला जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जखमींवर कामोठेच्या एमजीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दोन वर्षांमध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातांमध्ये १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे अपघात एक्स्प्रेस वेवर केल्या जाणाऱ्या पार्किंगमुळे झाले आहेत. पार्किंग केलेल्या वाहनांना पाठीमागून आलेल्या वाहनांची धडक दिल्याचे कारण या अपघातातून समोर आले आहे.
हे अपघात रोखण्यासाठी वाहनांच्या वेगमर्यादेवर १०० किमी प्रतितास असे बंधन लावण्यात आली आहे. मात्र लेनची शिस्त आणि वेगमर्यादा कुणी ही पाळत नसल्यामुळे या सारख्या दुर्घटना घडत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.