दक्षिण भारतातून होतेय मुंबईत चरस तस्करी, एकाला अटक


दक्षिण भारतातून होतेय मुंबईत चरस तस्करी, एकाला अटक
SHARES

मुंबई पोलिसांचं अंमली पदार्थविरोधी पथक आणि सेंट्रल नार्कोटीक कंट्रोल ब्युरोने मुंबईत काश्मिरमार्गे येणाऱ्या चरस तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर तस्करांनी दक्षिण भागातून मुंबईत चरस पाठवण्यास सुरूवात केली आहे. याप्रकरणी शनिवारी एका ४० वर्षीय कानडी तस्कराला सेंट्रल नार्कोटीक कंट्रोल ब्युरोने शनिवारी पनवेल मधून अटक केली. तपासणीत त्याच्याकडं ९८० ग्रॅम चरस आढळून आली.


'अशी' केली अटक

मूळचा कर्नाटकमध्ये राहणारा आरोपी जयातीर्थ राव (४०) हा संपर्क क्रांती एक्स्प्रेसने केरळहून मुंबईत चरस घेऊन येत असल्याची माहिती नार्कोटीक कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी ही एक्स्प्रेस पनवेल स्थानकावर थांबणार असल्याने नार्कोटीक कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी तिथं सापळा रचला. एक्स्प्रेस पनवेल स्थानकावर आल्यानंतर पोलिसांनी रावचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं. त्याच्या झडती घेतली असता त्याच्याजवळ ९८० ग्रॅम चरस आढळून आलं.



तस्करीचा काश्मिरमार्ग

या पूर्वी चरस तस्कर काश्मिरमार्गे मुंबईत चरस विक्री करण्यासाठी आणायचे. अशाच एका प्रयत्नात 'एएनसी'च्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी काश्मिरमधील हिना कबबी (२४) आणि मुझफ्फर भट (३४) या दोघांना अटक केली होती.


कोण आहे हिना?

हिना कबबी हिचा पती अंमली पदार्थांचा तस्कर हाेता. त्याचं निधन झाल्यावर हिना देखील या मार्गाकडं वळली. त्यानुसार हिनाने मुझफ्फर भट नावाच्या ओळखीच्या व्यक्तीकडून व्यवसायासाठी ३ लाख रुपये घेतले. त्यातून तिने चरस खरेदी केली आणि मुंबईतील चरस विकत घेणाऱ्या ग्राहकांची माहिती घेऊन विक्रीची तयारी केली. हिनाच्या उद्देशाबाबत मुजफ्फरला काहीही माहित नव्हतं.


'अशी' केली विक्री

त्यानंतर हिनाने मुझफ्फरकडं मुंबईला फिरायला जाण्याचा आग्रह धरला. त्यानुसार जानेवारीत हिना मुझफ्फरसोबत मुंबईत दाखल झाली. मुंबईत आल्यावर हिनाने अंधेरी, मालाड आणि कांदिवली परिसरात राहणाऱ्या ग्राहकांना चरसची विक्री केली. याबाबत नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना भेटवस्तू दिल्याचं हिनाने मुझफ्फरला सांगितलं.


अखेरी दिली कबुली

दोघेही घाटकोपर इथल्या हॅाटेलवर परतले असता, मुझफ्फरला हिनाच्या बॅगेत चरसच्या पुड्या दिसल्या. यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी आपण चरसची तस्करी करण्यासाठीच मुंबईला आल्याचं तसेच ज्यांची भेट घेतली ते नातेवाईक नसून तस्कर असल्याची कबुली हिनाने मुझफ्फरला दिली. याबाबत वाच्यता केल्यास पोलिस तुलाही अटक करतील, अशी भितीही तिनं त्याला घातली.


कोट्यवधींची तस्करी

जम्मू काश्मिरमध्ये अनंतनाग, संभल, उदयपूर, बारामुल्ला या भागात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत डोंगराळ भागात चरसची रोपे उगवतात. त्यांची छाटणी करून वर्षभर त्यांची तस्करी केली जाते. थंडीच्या ४ महिन्यांच्या काळात कोट्यवधी रुपयांची चरस तस्करी होत असल्याची माहीत तस्करांच्या माहितीतून पुढं आलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा