‘नवरंग’ स्टुडिओच्या मालकावर गुन्हा दाखल, जुन्या चित्रफितींमुळे आग फोफावली


SHARE

लोअर परळ येथील तोडी मिल्स कंपाऊंडमधील ‘नवरंग’ स्टुडिओला गुरुवारी रात्री लागलेल्या आगीप्रकरणी पोलिसांनी स्टुडिओ मालकावर गुन्हा नोंदवला आहे. स्टुडिओच्या चौथ्या मजल्यावर जुन्या चित्रपटांच्या चित्रफीती साठवून ठेवण्यात आल्याने या ज्वलनशील चित्रफितींमुळे आग फोफावली. अग्निशमन दलाने दिलेल्या तक्रारीवरून स्टुडिओच्या मालकावर विना परवाना ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवल्याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.


जुन्या चित्रफितींचा साठा

मुंबईच्या लोअर परळमधील तोडी मिल्‍स कंपाऊंडमध्ये असणारा नवरंग स्‍टुडिओ मागील २० वर्षांपासून बंद होता. गुरूवारी रात्री १ च्या सुमारास या स्टुडिओच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. या मजल्यावर अनेक जुन्या चित्रपटांच्या चित्रफिती साठवून ठेवण्यात आल्या होत्या. या चित्रफिती आगीच्या संपर्कात आल्यानंतर आग मोठ्या प्रमाणात फोफावली.

ही आग विझवताना एक अग्निशमन दलाचा जवानही जखमी झाला. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर फायर बिग्रेडच्या १२ गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्या. त्यामध्ये पाण्याचे ७ टँकर, एक रुग्णवाहिका घटनास्‍थळी दाखल झाल्‍या. अखेर ४ तासाच्या अथक प्रयत्नानंतर पहाटे ५ वाजता अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.


अग्निशमन दलाचा निष्कर्ष

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र ज्या ठिकाणी आग लागली. ती जागा मोठ्या अडगळीची होती. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या चित्रफितींमुळे ही आग मोठ्या प्रमाणात फोफावल्याचा निष्कर्ष काढत अग्निशमिन दलाचे (डिव्हीजनल फायर) अधिकारी संपत कराडे यांनी मानवी जीवितास व मालमत्तेस हानी पोहोचवणाऱ्या वस्तू ठेवल्याबद्दल स्टुडिओ मालकाच्याविरोधात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी हा गुन्हा नोंदवल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.हेही वाचा-

लोअर परळच्या 'नवरंग स्टुडिओ'ला आग, अग्निशमन दलाचा १ कर्मचारी जखमी


संबंधित विषय
ताज्या बातम्या