Advertisement

नेव्ही जवानाने पोहत जाऊन तरूणाला वाचवलं

९ सप्टेंबर रोजी रात्री नेव्हीचे अधिकारी आकाश, धनंजय आणि विश्वकर्मा हे नेहमीप्रमाणे मरीन ड्राइव्हच्या समुद्रात गस्त घालत होते. यावेळी समुद्र किनाऱ्यापासून १५० मीटर आत समुद्रात कुणीतरी बुडत असल्याचं त्यांना दिसून आलं.

नेव्ही जवानाने पोहत जाऊन तरूणाला वाचवलं
SHARES

मुंबईच्या मरीन ड्राइव्ह येथील समुद्रात बुडणाऱ्या तरुणाला नेव्हीच्या जवानांनी मोठ्या शर्थीने वाचवल्याची घटना रविवारी रात्री घडली. हा तरुण अद्याप बेशुद्ध अवस्थेत असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तरुणाची ओळख अद्याप पटली नसून पोलिस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.


समुद्रात उडी मारली

मरीन ड्राइव्हचा किनारा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि नेव्हीचे अधिकारी कायम या ठिकाणी लक्ष ठेवून असतात. ९ सप्टेंबर रोजी रात्री नेव्हीचे अधिकारी आकाश, धनंजय आणि विश्वकर्मा हे नेहमीप्रमाणे मरीन ड्राइव्हच्या समुद्रात गस्त घालत होते. यावेळी समुद्र किनाऱ्यापासून १५० मीटर आत समुद्रात कुणीतरी बुडत असल्याचं त्यांना दिसून आलं. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता याची माहिती मुंबई पोलिस कंट्रोल रुमला देत मदत मागवली. नेव्हीच्या बोटीने त्या बुडत्या तरुणाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, खवळलेल्या समुद्रात बोट तग धरत नव्हती. त्यामुळे धनंजय हे अधिकारी समुद्रात उडी टाकत बुडत असलेल्या तरुणाच्या दिशेने पोहत गेले.


तरूणावर उपचार सुरू

धनंजय आणि त्यांच्यासोबत असलेल्या आकाश आणि विश्वकर्मा या नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शर्थीने त्या तरुणाला बाहेर काढले. तोपर्यंत मरीन ड्राइव्ह पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. बुडणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात नेले. तरुण अद्याप बेशुद्ध असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नेव्हीचे अधिकाऱी आणि पोलिसांनी केलेल्या या विशेष कामगिरीचे यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी कौतुक केले.



हेही वाचा -


'भारत बंद' आंदोलन: ८८२ आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

संघवी हत्या प्रकरण: आरोपीला १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा