अंमली पदार्थ घेणाऱ्यांना जेलऐवजी पुनर्वसन केंद्रात टाका- नवाब मलिक

अंमली पदार्थांचं व्यसन असणाऱ्यांना तुरूंगाऐवजी पुनर्वसन केंद्रात टाकण्याची गरज असल्याचं राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.

अंमली पदार्थ घेणाऱ्यांना जेलऐवजी पुनर्वसन केंद्रात टाका- नवाब मलिक
SHARES

गांजा बाळगल्याप्रकरणी प्रसिद्ध हास्य अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांना नुकतीच अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली असून या दोघांनाही १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. या दोघांच्या अटकेमुळे मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यावर भाष्य करताना अंमली पदार्थांचं व्यसन असणाऱ्यांना तुरूंगाऐवजी पुनर्वसन केंद्रात टाकण्याची गरज असल्याचं राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले की, अंमली पदार्थ विरोधी पथकाने आतापर्यंत ज्यांना अंमली पदार्थ घेतल्याप्रकरणी अटक केली आहे, त्या सगळ्यांना तुरूंगाऐवजी पुनर्वसन केंद्रात पाठवलं पाहिजे. अंमली पदार्थाच्या तस्करांना शोधून काढणं हे एनसीबीचं कर्तव्य आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे त्यांना अधिकार नाही. अशा प्रकारे एनसीबी खरंच सिने क्षेत्राला ड्रग्ज घेणाऱ्यांपासून वाचवत आहे का? असा प्रश्न देखील नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) अटक केलेली प्रसिद्ध टीव्ही काॅमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांनाही रविवार २२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील हाॅलिडे कोर्टासमोर हजर केलं असता, कोर्टाने या दोघांनाही १४ दिवसांची (४ डिसेंबरपर्यंत) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  

हेही वाचा- भारती सिंह, हर्ष लिंबाचीयाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एनसीबीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एनडीपीएस अॅक्टनुसार व्यावसायिक वापराकरीता नसलेला १ हजार ग्रँम वजनापर्यंतचा गांजा आढळून आल्यास दोष सिद्ध झालेल्या आरोपीला किमान ६ महिन्यांचा कारावास आणि १० हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

एका ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीच्या पथकाने शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी भारती सिंहचं अंधेरी, लोखंडवाला काॅप्लेक्स येथील घर आणि कार्यालयावर धाड टाकली होती. या धाडीत एनसीबीच्या पथकाला भारतीच्या घरात गांजा आढळून आला होता. 

भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांनीही गांजा बाळगल्याचं मान्य केल्यानंतर भारतीला अटक करण्यात आली. तर हर्ष याची एनसीबीने १७ तास कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली.

भारतीच्या घरात एकूण ८६.५ ग्रॅम गांजा सापडला आहे. हा गांजा एनसीबीच्या पथकाने जप्त केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा