ड्रग्ज तस्करी प्रकरणी 'सपा' नेत्याच्या पुतण्याला अटक


ड्रग्ज तस्करी प्रकरणी 'सपा' नेत्याच्या पुतण्याला अटक
SHARES

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांच्या पुतण्याला सांताक्रूझ येथील पंचतारांकीत हाॅटेलमधून अटक केली आहे. अबु असलम कासीम असे अबू आझमींच्या पुतण्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केल्याचा दावा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केला आहे. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल 40 कोटी रुपये किंमतीचे 5 किलो आईस नावाचे ड्रग्ज जप्त केले आहे. या टोळीचा मुंबईतील मुख्य सुत्रधार अबू अस्लम कासीम आझमी उर्फ अस्लम (43) याला मंगळवारी रात्री सांताक्रूझमधील ग्रॅन्ड हयात या पंचतारांकीत हॉटेलमधून बेड्या ठोकल्या आहेत.

दुबईतून पार्टी ड्रग्ज तस्करीचे एक रॅकेट चालवले जात असून याचा मुख्य सुत्रधार मुंबईत वास्तव्यास असल्याची माहिती दिल्लीच्या स्पेशल सेलला मिळाली होती. या टोळीकडून मुंबई, दिल्ली, चंडीगडसह देशातील मेट्रो सीटीमध्ये पार्ट्या, रेव्ह पार्ट्यांना सर्रासपणे आईस नावाच्या ड्रग्जचा पुरवठा केला जातो. ही टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा कार्यरत असून फ्रान्स, जर्मनी, युके, युएई, स्पेन आणि युएसएमध्ये ड्रग्जचा पुरवठा करत होती. या टोळीने परदेशात पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली.

मुंबईतून पाठवण्यात आलेले ड्रग्ज दिल्ली-जयपूर हायवेलगतच्या रोड नंबर 7, महिपालपूरमध्ये असलेल्या प्रेफर लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीमध्ये नेऊन तेथे या ड्रग्जची पॅकिंग करण्यात येणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मंगळवारी पहाटे मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला आणि अवधेश कुमार (26) नावाच्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून तब्बल 40 कोटी रुपये किंमतीचे 5 किलो आईस हे पार्टी ड्रग्ज सापडले. त्यानंतर ड्रग्ज तस्करीच्या टोळीमध्ये प्रेफर लॉजिस्टीक प्रा. लि. कंपनीचा मॅनेजर चंदन राय (31) आणि कामगार अमितकुमार अग्रवाल (40) यांचा सहभाग उघडकीस येताच पोलिसांच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. आरोपींच्या चौकशीमध्ये हे ड्रग्ज मुंबईतील सुत्रधार अबू अस्लम कासीम आझमी उर्फ अस्लम (43) याच्याकडून आल्याची माहिती मिळताच मंगळवारी रात्री मुंबईत आलेल्या दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने वाकोला पोलिसांच्या मदतीने आझमी याला रात्री पावणे अकराच्या सुमारास बेड्या ठोकल्या. टोळीचा मुख्य सुत्रधार कैलाश राजपूत हा दुबईमध्ये वास्तव्यास असून त्याच्यासोबतच रॅकेटमध्ये सहभागी असलेल्याचा शोध दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा