उडी मारताना अंदाज चुकल्याने नायझेरियन आरोपीचा मृत्यू


उडी मारताना अंदाज चुकल्याने नायझेरियन आरोपीचा मृत्यू
SHARES

बनावट पासपोर्ट प्रकणात अटकेत असलेल्या नायझेरियन तरुणाने पळ काढताना उड्डाणपूलाहून उडी घेतली असता अंदाज चुकल्याने त्याचा पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. इजबेले इमेका बोनएवेनचर (३४) असं या मृत नायझिरयन तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.


आणि त्याचा अंदाज चुकला

बनावट पासपोर्टच्या मदतीने भारतात आलेल्या इजबेले इमेका बोनएवेनचर या नायझेरियन नागरिकाला बुधवारी सकाळी पोलिसांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाहून अटक केली. इजबेले इमेका बोनएवेनचरला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशीसाठी नेत होते. त्यावेळी उन्नत उड्डाणपुलावर पोलिसांची गाडी पोहचली असताना आरोपीने चालत्या गाडीतून पोलिसांचा हात झटकून बाहेर उडी टाकली. त्यानंतर इजबेले इमेकाने पळ काढला. मात्र पोलिस मागावर असल्याने त्याने मोठ्या हिंमतीने उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या बसवर उडी मारून पळण्याचं ठरवलं.  पोलिस त्याला पकडणार तोच त्याने उड्डाणपुलाहून खाली उडी घेतली. मात्र त्याचा अंदाज चुकल्याने तो तब्बल ३० फूटावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. 


पुढील तपास सुरू

पोलिसांनी तातडीने इजबेले बोनएवेनचरला जवळील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी सहार पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली आहे. याबाबत पोलिसांनी इजबेले इमेका बोनएवेनचरच्या मृत्यूची बातमी नायझेरियन दूतवासास देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा