नायझेरियन तस्करांचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला, दगडानं ठेचून मारण्याचा प्रयत्न

नायझेरियन तस्करांनी पोलिसांवर हल्ला करत दोन पोलिस अधिकाऱ्यांना दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्यात तीन पोलिस कर्मचारी व दोन अधिकारी गंभीर जखमी झाले.

नायझेरियन तस्करांचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला, दगडानं ठेचून मारण्याचा प्रयत्न
SHARES

मुंबईत नशेचा अंमल दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये परदेशी नागरिक (नायझेरियन) तस्करांचं प्रमाण सर्वाधिक आहे. भायखळाच्या खडा पारशी परिसरात नायझेरियन तस्करांवर शुक्रवारी अंमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी कारवाईसाठी गेले होते. यावेळी मोठ्या संख्येने असलेल्या नायझेरियन तस्करांनी पोलिसांवरच हल्ला करत दोन पोलिस अधिकाऱ्यांना दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नायझेरियन तस्करांनी केलेल्या हल्यात तीन पोलिस कर्मचारी व दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी जे.जे. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


रेल्वे पोलिसांची टाळाटाळ

भायखळाच्या रेल्वे वसाहतीजवळील बरकले कम्पाऊंडजवळ दररोज नायझेरियन अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येत असतात. याबाबतच्या तक्रारी अंमली पदार्थविरोधी विभागाच्या 'दक्ष नागरिक' या हेल्पलाईनवर येत होत्या.  विशेष म्हणजे हे नायझेरियन ज्या रेल्वे पोलिसांच्या हद्दीत वावरत असतात तेथील रेल्वे पोलिसांनी स्वत: कारवाई करायचे सोडून हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली होती. तसंच नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत वरळीच्या युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांनी त्यांचे पथक गुरूवारी रात्री पाठवले. या पथकात एकूण बारा जण होते. पोलिस रात्री ९.३० च्या सुमारास घटनास्थळी पोहचले.


२० नायझेरियनचा हल्ला

पोलिसांना यावेळी भायखळाच्या बरकाले कम्पाऊंडजवळ एक नायझेरियन तरूण महाविद्यालयीन तरुणांना अंमली पदार्थ देऊन पैसे घेऊन रेल्वे पटरीच्या दिशेने जात असल्याचे दिसले. यावेळी संधी न दवडता साध्या वेशात असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन चव्हाण, अमर मराठे, पोलिस काॅन्स्टेबल रविंद्र मते, दत्ताराम माळी, राजू तडवी यांनी त्या नायझेरियन तरूणाला पकडलं. 

पोलिसांनी पकडल्यानंतर धिप्पाड देहाच्या त्या नायझेरियन तरुणाने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी धडपड सुरू केली. त्यावेळी त्याने आरडाओरड केल्याने पटरीवर बसलेल्या त्याच्या २० साथीदारांनी त्या दिशेने धाव घेतली. साध्या वेशातील पोलिस कारवाई करण्यासाठी आल्याचं लक्षात आल्यानंतर नायझेरियन तरुणांनी पोलिसांच्या दिशेने पटरीवरील दगड भिरकवण्यास सुरूवात केली. काही पोलिस त्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी ठरले. तर काही जण पोलिसांना घेरून मारू लागले.


डोक्यात घातला दगड

सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन चव्हाण आणि अमर मराठे यांना तेथील सात ते आठ नायझेरियन तस्कर मारत होते. झटापटीत मराठे हे खाली पडले असताना एका नायझेरियन तस्कराने मोठा दगड मराठे यांच्या डोक्यात टाकला. मराठे यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. तो नायझेरियन दुसऱ्यांदा मराठे यांच्या डोक्यात दगड टाकणार तोच मराठे आणि चव्हाण या अधिकाऱ्यांनी त्या तस्करांना धक्का देऊन तेथून पळ काढला.


वाहनचालकांनी मदत नाकारली

रक्तबंबाळ अवस्थेत पोलिस रस्त्यावर रात्री १ च्या सुमारास ये - जा करणाऱ्या वाहनांकडं मदत मागत होते. मात्र, कुणीही त्यांच्या मदतीला आले नाही. त्याच वेळी गुन्हे शाखेच्या प्राॅपर्टी सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित पवार हे त्यांच्या गाडीने जात असताना त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या मराठे यांना पाहिलं. पवार यांनी जखमी अमर मराठे, सुदर्शन चव्हाण, काॅन्स्टेबल रविंद्र मते, दत्ताराम माळी, राजू तडवी यांना गाडीत बसवून जे.जे. रुग्णालयात नेले. मराठे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ बाॅम्बे रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. तर इतर पोलिसांना उपचार करून सोडून देण्यात आले.


हद्दीचा वाद उपस्थित 

या प्रकरणी जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यात नायझेरियन तस्करांविरोधात भादवि कलम  ३०७, ३५३, ३२६, ३२४, ३३८, ३८७, २४२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३४ अाणि १२० (बी) नुसार  गुन्हा नोंदवला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. घटना घडल्याचं ठिकाण रेल्वे, भायखळा आणि जे.जे.मार्ग पोलिसांच्या हद्दीत येत असले तरी घटनेनंतर संबधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी
मदत करण्याऐवजी हद्दीचा वाद उपस्थित करत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.


या प्रकरणाची गंभीर दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.  परदेशी तस्करांविरोधात कारवाईचा फास आवळण्यात येईल.
- शिवदीप लांडे, पोलिस उपायुक्त, अंमली पदार्थविरोधी पथक



हेही वाचा -

रोड रोमियोला तरुणींनी दाखवला हिसका

कार्ड क्लोनिंगसाठी रशियन अॅपचा वापर, अनेक परदेशी नागरिकांना गंडा



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा