कार्ड क्लोनिंगसाठी रशियन अॅपचा वापर, अनेक परदेशी नागरिकांना गंडा


कार्ड क्लोनिंगसाठी रशियन अॅपचा वापर, अनेक परदेशी नागरिकांना गंडा
SHARES

भारतात पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या डेबीट आणि क्रेडीट कार्डची माहिती चोरून लुटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. या टोळीचा मुख्य सूत्रधार मनोजकुमारच्या चौकशीतून या परदेशी नागरिकांना फसवण्यासाठी आणि आपली चोरी पकडली जाऊ नये यासाठी 'आयसीक्यू' या रशियन अॅपचा वापर केल्याची माहिती उघडकीस अाली अाहे. या अॅपचा डाटा मिळवणं सुरक्षा यंत्रणांना अवघड जातं. त्यामुळे या अॅपची निवड केल्याचं मनोजकुमारने पोलिसांना सांगितलं आहे.


मुख्य अारोपीला चेन्नईत अटक

भारतात येणारे परदेशी नागरीक ते ज्या दुकानात खरेदी करतात दुकानदारांना हाताशी धरून क्रेडीट आणि डेबीट कार्डद्वारे त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या प्रकरणी पोलिसांनी जुबेर सय्यद (३०), हसन शेख (४०), फईम शेख (३०), अबू बोकर (४५), मुकेश शर्मा (४५) या आरोपींना अटक केली होती. मात्र, या टोळीचा मुख्य सूत्रधार मनोजकुमार फरार होता. १२ जुलै रोजी मनोजकुमार चेन्नई येथे येणार असल्याची महिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चेन्नई सुरक्षा यंत्रणांची मदत घेऊन त्याला अटक केली.


फसवणुकीसाठी आयसीक्यू अॅप

मनोजकुमारच्या चौकशीत फसवणुकीसाठी या टोळीनं कायमच 'आयसीक्यू' या अॅपचा वापर केला असल्याचं उघडकीस अालं. याचं कारण म्हणजे या अॅप्लिकेशनच्या मदतीनं कुणालाही संपर्क साधल्यास त्यांची महिती सुरक्षा रक्षकांना सहजरित्या मिळत नाही. त्यामुळे या टोळीतील सदस्यांचा मोबाइल कुणाचाही हाताला लागल्यास त्या व्यक्तीला यातलं काही कळत नाही.


अॅपची माहिती मलेशियातून

विशेष म्हणजे या पूर्वीही अशा प्रकारच्या अनेक घटनांमध्ये चोरांनी या अॅप्लिकेशनचा वापर केला असल्याचं निदर्शनास आलं आहे. या अॅपद्वारे कोण कोणाच्या संपर्कात आहे हे पण कळत नाही. या अॅप्लिकेशनची माहिती मनोजला मलेशियात मिळाली. मनोज नोकरीसाठी मलेशियाला गेला होता. त्या ठिकाणी काॅल सेंटरमध्ये काम करताना तो कार्ड क्लोनिंग करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आला. त्यानंतर त्या मित्रांच्या मदतीनं त्याने भारतात हे रॅकेट सुरू केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.



हेही वाचा -

परदेशी ड्रग्ज तस्करांना मस्जिदमधून अटक

मरीन ड्राइव्हवर आढळला महिलेचा मृतदेह




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा