पोलीस चौकीसमोरच भरतो दारूचा अड्डा

कांदीवलीमध्ये पोलीस चौकीच्या समोरच दारूडे दारू पित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कांदीवली पश्चिमेकडील लिंकरोड येथील पोलीस चौकीच्या समोरच हा सगळा प्रकार घडत आहे. तरी देखील पोलीस याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या अगोदर परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त विक्रम सिंह यांनी अशा दारूड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाचे पालनही झाले. मात्र आता पुन्हा जैसे थे परिस्थिती पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या दारूड्यांना वेळ ना काळ. हे दारूडे रिक्षात बसून खुलेआम दारू पितात.

या परिसरातील लालजी पाडा लिंक रोड जवळच चार शाळा आणि अनेक क्लासेस आहे. मात्र या क्लास आणि शाळांनाच लागून दारूचे अड्डे, बियर शॉप तसेच चायनीज सेंटर आहेत आणि या सगळ्याचा त्रास इथे शिकणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना सहन करावा लागत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दारूड्यांकडून महिलांची छेड काढण्याचे प्रकारदेखील अनेकदा घडले आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा नेमकी करतेय तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading Comments