माजी सैनिकाला मारहाण करणा-या ‘या’ भाजप खासदारांची केस ओपन होणार

माजी सैनिकाला मारहाण केल्यानंतरही तत्कालिन सरकारने आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा कार्यभार होता.

माजी सैनिकाला मारहाण करणा-या ‘या’ भाजप खासदारांची केस ओपन होणार
SHARES

मुंबईच्या कांदिवली परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र सोशल मिडियावर अपलोड केल्यानंतर शिवसैनिकांनी एका माजी नौदल अधिकाऱ्याला चोप दिला. यावरून वातावरण चांगलेच तापले, स्वत: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजी ही गुंडागर्दी थांबवा. अशा आशयाचे ट्विट करत शिवसेनेवर टिका केली. याप्रकरणात चार शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर आता जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी चार वर्षापूर्वी एका माजी सैनिकाला मारहाण केली होती. त्यावेळी गृहमंत्रीपद स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असूनही आरोपींवर कोणतिही कारवाई करण्यात आली नव्हती. बहुदा याचीच आठवण फडणवीस यांना करून देण्यासाठी, या संदर्भात मिळालेल्या निवेदनानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

हेही वाचाः- मुंबई-ठाण्यात म्हाडा परवडणारी घरं बांधणार- जितेंद्र आव्हाड

२०१६ मध्ये उन्मेष पाटील आमदार होते. तेव्हा भाजपचे सरकार राज्यात होते. माजी सैनिकाला मारहाण केल्यानंतरही तत्कालिन सरकारने आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा कार्यभार होता. चाळीसगाव येथील सोनू महाजन असे या पीडित माजी सैनिकाचे नाव आहे. ते किरायाच्या घरात चाळीसगाव येथे राहत होते. माजी सैनिक सोनू महाजन एका कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करीत होते. माजी सैनिक सोनू महाजन घरात कुटुंबियांसोबत बसलेले असताना २ जून २०१६ रोजी आमदार उन्मेष पाटील काही गुंडांना घेऊन घरात घुसले. यावेळी काही महिलाही त्यांच्यासोबत होत्या. आमदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात व त्यांच्या सांगण्यावरून इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यात माजी सै्निक सोनू महाजन गंभीररित्या जखमी झाले. एका महिलेने माजी सैनिक सोनू महाजन यांच्या पत्नी मनीषा महाजन यांना चावा घेतला. दिवसाढवळ्या झालेल्या या मारहाणीने शेजारचे लोक जमा झाल्यानंतर आमदार उन्मेष पाटील व त्यांचे साथीदार पळून गेले. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेतली नाही. माजी सैनिक सोनू महाजन जखमी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतरही जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली परंतु त्यांनीही कोणतीही कारवाई केली नाही. चाळीसगाव पोलीसांनी उलट माजी सैनिक असलेल्या सोनू महाजन यांच्यावरच उलटे गुन्हे दाखल करून आरोपींना संरक्षण देण्याचे काम केले.

हेही वाचाः- गुड न्यूज! वकिलांनाही आता लोकलप्रवासाची मुभा

राजकीय दबावामुळे पोलिस कारवाई करीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर माजी सैनिक सोनू महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. औरंगाबाद उच्च न्यायालयान माजी सैनिक सोनू महाजन यांची तक्रार दाखल करून एफआयआर नोंदविण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर माजी सैनिक सोनू महाजन यांच्या पत्नी मनीषा सोनू महाजन यांचा जवाब पोलिसांनी नोंदवून घेतला. या जवाबात भाजपचे नेते उन्मेष पाटील यांच्यावर थेट आरोप केले आहेत. माजी सैनिक सोनू महाजन यांच्या पत्नी मनीषा महाजन यांनी या प्रकरणाची फेरचौकशी करण्यात यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. २०१६ मध्ये केवळ राजकीय दबावापोटी कारवाईपासून दूर राहिलेल्या भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. या निवेदनाची दखल घेऊन गृहमंत्री देशमुख यांनी चार वर्षांपूर्वी माजी सैनिकाला मारहाण करणा-या उन्मेष पाटील त्यांच्या साथीदाराविरोधातील केस पुन्हा उघड करण्याचे आश्वासन दिले आहे.

संबंधित विषय