तुम रिझर्व्ह कॅटेगरी से हो ना, असं म्हणत पायलचा जातीवाचक छळ

आत्महत्येच्या दिवशी पायल डे ड्युटी करून हाॅस्टेलवर गेली होती. त्यावेळी एका रुग्णाची फाईल मिळत नसल्यामुळे हेमा, भक्ती आणि अंकिता या तिघी रुग्णालयातच पायलच्या नावाने आरडाओरडा करत होत्या. त्यावेळी तिघींनी पायलला वारंवार फोनही केले.

तुम रिझर्व्ह कॅटेगरी से हो ना, असं म्हणत पायलचा जातीवाचक छळ
SHARES

डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत १२ डाॅक्टरांचे जबाब नोंदवले आहेत. त्यातील एका डाॅक्टरने पायलला आरोपी महिला डाॅक्टरांकडून जातीवाचक बोलण्यात आल्याची माहिती दिली आहे. पायलच्या आत्महत्येनंतर तिची जवळची मैत्रिणी स्नेहल ही मानसिक तणावाखाली गेली असून तिचं डाॅक्टरांकडून समुपदेशन सुरू आहे.


जातीवाचक उच्चार

नायर रुग्णालयात २२ मे रोजी पायलने वरिष्ठ डाॅक्टरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पायल रुग्णालयात ड्युटीवर असताना एका रुग्णाची फाइल मिळत नव्हती. त्यावरून हेमा पायलवर ओरडत होती. त्यावेळी हेमाने 'तुम रिझर्व्ह कॅटेगरी से हो ना? तुम्हे 'नीट' के एक्झाम मे कौनसा रँक मिला', अशी विचारणा सर्वांसमोर केली होती.


काय झालं त्या दिवशी?

आत्महत्येच्या दिवशी पायल डे ड्युटी करून हाॅस्टेलवर गेली होती. त्यावेळी एका रुग्णाची फाईल मिळत नसल्यामुळे हेमा, भक्ती आणि अंकिता या तिघी रुग्णालयातच पायलच्या नावाने आरडाओरडा करत होत्या. त्यावेळी तिघींनी पायलला वारंवार फोनही केले. मात्र, पायल फोन उचलत नसल्यामुळे तिघींना स्नेहलला पायलला बोलवून आणण्यास सांगितले. स्नेहल रात्री ९ वाजता पायलच्या खोलीवर गेली. पायलच्या खोलीचा दरवाजा बंद असल्यामुळे स्नेहल बाहेरून हाक मारत होती. मात्र, पायलकडून कोणतंही उत्तर मिळत नव्हतं.

घाबरलेल्या स्नेहलने ही बाब तिच्या इतर सहकाऱ्यांसह तिन्ही महिला आरोपींना सांगितली. त्यानंतर सर्व महिला डाॅक्टर आणि इतर कर्मचारी पायलच्या खोलीबाहेर जमा झाले होते. त्यांनी दरवाजा तोडून पायलच्या खोलीत प्रवेश केला. त्यावेळी पायलने ओढणीच्या मदतीने गळफास घेतल्याचं दिसून आलं. पायलला वाचवण्यासाठी सर्वांनी तिला गळफासातून सोडवर उपचारासाठी नेले. मात्र तोपर्यंत पायलचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं.


चौकशी अपूर्ण

महिला आरोपी डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल यांना सत्र न्यायालयाने १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यांचं गांभीर्य, व्याप्ती पाहून तपास गुन्हे शाखेकडं गुरूवारी वर्ग करण्यात आला. त्यामुळे गुरूवारचा संपूर्ण दिवस कागदोपत्रांची जमावजमव करण्यात गेला. पोलिस कोठडी संपत असल्याने तिन्ही आरोपी डॉक्टरांना शुक्रवारी पोलिसांनी सत्र न्यायालयात हजर केलं. या प्रकरणाचा तपास गुरुवारी सायंकाळनंतर आमच्याकडे आल्याने आरोपींची चौकशी करण्याची संधी मिळाली नाही. त्याप्रमाणे अनेकांचे जबाब नोंदविणे अद्याप बाकी असल्याचं सांगत गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्याने शुक्रवारी न्यायालयात आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली.


आरोप -प्रत्यारोप

तिन्ही आरोपी पायल आणि स्नेहलला वारंवार त्रास द्यायच्या. विशेषता या तिघी पायललाच टार्गेट करायच्या, हे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात उघडकीस झालं आहे. अनेकदा कामाच्या नावाखाली तिघींनी वरिष्ठ पदाचा चुकीचा वापर करून काम करवून घेतल्याचेही निदर्शनास आलं आहे. तर आरोपींच्या वकिलांकडून पोलिसांकडून करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. रुग्णालयात रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अशा प्रेशरमध्ये कामंही पटापट करावी लागतात. मात्र, पायलला ते जमत नव्हतं. त्यामुळे तिच्यावर ओरडलं जात होतं. मात्र, ओरडताना कधीही तिला जातीवाचक बोलण्यात आलं नसल्याचं आरोपींच्या वकिलांकडून सांगण्यात आलं आहे


निष्पक्षपाती चौकशी करा

पायलने गळफास घेतल्याचं पाहिल्यानंतर हेमाने सर्वप्रथम तिच्या वडिलांना फोन केला. 'बाबा मला खूप भीती वाटतेय. पायलने गळफास घेतला. मी तिला ओढणीत लटकताना पाहिलं' असं ती सांगत होती, अशी प्रतिक्रिया हेमाचेे वडील सुरेश आहुजा यांनी दिली. मी पायलला गळफास घेतलेल्या स्थितीत पाहिलंय. त्यामुळे भीती वाटतेय, असे हेमा म्हणाली, असा दावा त्यांनी केला. तर अंकिताच्यावडिलांनी माझी मुलगी कुणाचा छळ करूच शकत नाही, जातीवाचक टोमणे मारणे दूरच असं म्हटलं आहे. निष्पक्षपाती चौकशी करा, दोषी असेल तर जरूर शिक्षा द्या, असं अंकिता हिचे वडील कैलाश खंडेलवाल यांनी सांगितलं.



हेही वाचा  -

डेटींगच्या नावाखाली 'सीए'ला ३ लाखांना गंडवलं

'करण ओबेरॉयवरील गुन्हा मागे घे', तक्रारदार महिलेला धमकी




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा