पीएमसी बॅंक प्रकरणी तिघांना अटक

चौकशीत त्यांनी असमाधानकारक उत्तरे दिल्यामुळे अखेर त्यांना अटक करण्यात आली

पीएमसी बॅंक प्रकरणी तिघांना अटक
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह(पीएमसी) बॅंकेतील ६ हजार ६७० कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बॅंकेचे माजी संचालकासह दोन मुल्यांकन तज्ज्ञ यांना गुरूवारी अटक करण्यात आली. तिनही आरोपींना १६ मार्चपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणातील अटक आरोपींची संख्या १५ वर पोहोचली आहे.

हेही वाचाः- coronavirus updates: यंदाची IPL रद्दच करा, केंद्राची BBCI ला सूचना

माजी संचालक जसबिंदर सिंग बनवैत याला ठाण्यातून, तर दोन मुल्यांकन तज्ज्ञ विश्‍वनाथ प्रभु व श्रीपाद जेरे या दोघांनाही मुंबईतून अटक करण्यात आली. जसबिंदर बनवैत याला या गैरव्यवहाराची माहिती होती, पण त्याच्याकडे आरोपीने कानाडोळा केला. याशिवाय दोनही मुल्यांकन कज्ज्ञांनी चढ्या भावाने मालमत्ता एचडीआयएलच्या सात मालमत्ता दाखवल्या. त्यामुळे आरबीआयच्या नियमानुसार एचडीआयएल एवढ्या कर्जाच्या रकमेसाठी पात्र ठरले. पीएमसी बॅंकेने दिलेल्या एकूण कर्जाच्या रकमेपैकी ७३ टक्के कर्ज हे एचडीआयएलला देण्यात आली होती. जसबिंदर बनवैत हे बॅंकेच्या कर्ज समितीचे सदस्य होते. २००५ ते २०१०कालावधील बॅंकेच्या गुंतवणूक समितीवर, तर २०१० ते २०२० कालावधील कार्यकारी समितीवर नियुक्त होते. बॅंकेने एचडीआयएलला दिलेल्या कर्जाबद्दल त्यांची चौकशी करण्यात आली होती. पण चौकशीत त्यांनी असमाधानकारक उत्तरे दिल्यामुळे अखेर त्यांना अटक करण्यात आली.

हेही वाचाः- राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे चंद्रकांत खैरे भडकले

रिझर्व्ह बॅंकेने नेमलेल्या प्रशासकाने आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) ६६७० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी पीएमसी बॅंकेचा तत्कालीन व्यस्थापकीय संचालक जॉय थॉमस याच्या जबाबाच्या आधारावर कर्ज देण्यात काही अनियमितता असल्याचे उघड झाले होते. ही अनियमितता २००८ नंतर दिसून आल्यामुळे तेव्हापासूनचे पुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान ईओडब्ल्यूपुढे आहे. याप्रकरणी भारतीय दंड विधानातील कलम क्र. ४२० (फसवणूक), ४०६(विश्‍वासघात), ४०९ (सरकारी अधिकाऱ्याकडून विश्‍वासघात), ४६५ (बनावटीकरण), ४६८ (फसवणुकीसाठी बनावटीकरण) व १२०(ब) (गुन्हेगारी कट रचणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आला. पुढे याप्रकरणी मनी लॉंडरिंगचे पुरावे प्राथमिक तपासात मिळाल्यामुळे ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा