बोगस डाॅक्टरची 'अशी'ही रुग्णसेवा? क्लिनिकच्या बंद दाराआड चालवायचा वेश्याव्यवसाय

माहिमच्या फिशरमन काॅलनीत एक बोगस डाॅक्टर क्लिनिक उघडून तिथं दिवसाढवळ्या चक्क वेश्याव्यवसाय चालवत होता. सोमवारी रात्री मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखा आणि माहीम पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून त्याच्यासोबत दोन महिलांनाही ताब्यात घेतलं आहे.

बोगस डाॅक्टरची 'अशी'ही रुग्णसेवा? क्लिनिकच्या बंद दाराआड चालवायचा वेश्याव्यवसाय
SHARES

डाॅक्टरकीची कुठलीही पदवी नसताना रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डाॅक्टरांचा पर्दाफाश झाल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा वाचलं असेल. पण माहिममध्ये असं एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एक बोगस डाॅक्टर क्लिनिक उघडून तिथं दिवसाढवळ्या चक्क वेश्याव्यवसाय चालवत होता. सोमवारी रात्री मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखा आणि माहीम पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून त्याच्यासोबत दोन महिलांनाही ताब्यात घेतलं आहे. जनार्दन नरसैया भोगा (६२) असं त्याचं नाव आहे.


'असा' झाला पर्दाफाश?

माहिमच्या फिशरमन काॅलनीतील बिल्डिंग नंबर २१ च्या तळमजल्यावर ३ वर्षांपासून आरोपी भोगा भाड्याने क्लिनिक चालवत होता. १८० स्क्वे. फुटांच्या जागेत त्याने तीन पार्टीशन केलं होतं. इथे तो वेश्याव्यवसाय चालवायचा. कायम वर्दळ असलेल्या रहिवाशी बिल्डिंगमधील डॅाक्टरच्या क्लिनिकमध्ये महिलांचा आणि पुरूषांचा कायम राबता होता. हे सर्वजण क्लिनिकमध्ये पेशंट म्हणून यायचे. मात्र एसी क्लिनिकमधील बंद दाराआड नेमकं काय सुरू आहे? याचा शेजारच्यांना थांगपत्ता लागत नव्हता. कारण तो इतर कुणाच्याही संपर्कात येत नसे. जवळच्या परिसरातील एखादा पेशंट त्याच्याजवळ गेल्यावर तो आपण संबंधित आजावर उपचार करत नाही, असं म्हणून पेशंटला परत पाठवत असे.



रहिवाशांना थांगपत्ताही नाही

अशातच सोमवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेला खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी माहीम पोलिसांना सोबत घेऊन सापळा रचला आणि या सापळ्यात आरोपी भोगा अलगद अडकला. पोलिसांच्या कारवाईनंतर हा बोगस डाॅक्टर क्लिनिकमध्ये वेश्या व्यवसाय चालवत असल्याची धक्कादायक बाब रहिवाशांच्या लक्षात आली.

वरळी परिसरात राहणाऱ्या आरोपी भोगाच्या मोबाईलमध्ये अनेक महिला आणि तरूणींचे मोबाईल नंबर, व्हाॅट्सअॅप ग्रुप पोलिसांना आढळून आले आहेत. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


क्लिनिकच्या पाटीवरचे 'ते' डाॅक्टर कोण?

कोणतीही पदवी नसताना आरोपी भोगाने बीएमएस डॅाक्टर असल्याचं सांगत क्लिनिकबाहेर तशी पाटीही लावली होती. विशेष म्हणजे त्यावर अन्य दोन डॅाक्टरांची नावे लिहिण्यात आली असून ते दोघे कोण आहेत. याचा पोलीस तपास घेत आहेत. आर्थिक फायद्यासाठी आपण हे करत असल्याची कबुली भोगा आणि अन्य दोन महिलांनी पोलिसांना दिली आहे. या तिघांना न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून माहीम पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा