बनावट परदेशी नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


बनावट परदेशी नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
SHARES

भारतीय चलनाच्या तुलनेत युरोपीयन देशातील युरोंना बाजारात मोठी मागणी असते. त्याचाच फायदा घेऊन काही भुरट्या चोरट्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून बनावट युरो मागवून त्या भारतातील किंमतीनुसार विकत फसवणूक करण्यास सुरूवात केली आहे. नुकताच या टोळीचा गुन्हे शाखा ४ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने २२ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


'अशी' झाली फसवणूक

काही दिवसांपूर्वी ३ जणांनी इंटरनेटवर कमी किंमतीत युरो मिळवून देण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. भारतीय चलनाच्या तुलनेत युरोपियन देशातील युरोला बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळेच कमी किंमतीत खरे युरो मिळत असल्याने सायन कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या एका तक्रारदाराने युरो खरेदी करण्यासाठी इच्छुक असल्याचं कळवलं.

त्यानुसार ३ आरोपींनी तक्रारदाराला काही हजार रुपयात युरोच्या नोटा दिल्या. या युरो नोटा घेऊन तक्रारदार त्या बदल्यात भारतीय चलनी नोटा घेण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला युरोच्या नोटा बनावट असल्याचे समजलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांची मदत घेत गुन्हा नोंदवला.


पोलिसांनी रचला सापळा

त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू करत बोगस गिऱ्हाईक बनत पुन्हा आरोपींशी संपर्क साधला. पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी पोलिसांनी आरोपींना सायन कोळीवाडा येथील बीएमसी काॅलनीत बोलवलं. त्यानुसार युरो देण्यासाठी आलेला गौरव दळवी, स्वप्निल शिंदे आणि संदेश कांदळगावकर या आरोपींना पोलिसांनी बनावट युरोच्या चलनासह सापळा रचून रंगेहाथ पकडलं.


वरच्या ६ नोटा खऱ्या

हे चलन युरोपियन युनियनच्या २८ देशांपैकी १९ देशांमध्ये अधिकृतरित्या वापरलं जातं. पोलिसांनी या तिघांजवळून प्रत्येकी ५० रुपये दराच्या परदेशी चलनाच्या एकूण ४२ नोटा हस्तगत केल्या आहेत. यातील वरच्या ६ नोटा खऱ्या असून उर्वरित नोटा बनावट असल्याचं प्राथमिक माहितीत पुढे आलं आहे.


कुठल्या साईटवरून फसवणूक?

पोलिस चौकशीत या आरोपींनी 'डार्कनेट' या साईटवरून या नोटा मागवून त्या नागरिकांना कमी किंमतीत देण्याचं आमीष दाखवून फसवणूक करायचे. कारण परदेशी चलन खरे आहेत की खोटे हे भारतीय नागरिकांना तातडीने लक्षात येणार नाही. त्यामुळे या आरोपींना अशा प्रकारे फसवणूक करण्यास सुरूवात केली असल्याची कबुली पोलिसांना दिली. या तिघांनाही न्यायालयाने २२ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती गुन्हे शाखा ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले यांनी दिली.



हेही वाचा-

दादर चौपाटीवर देवीच्या विसर्जन मिरवणुकीत एकाची हत्या

लोकलमधील सराईत महिला चोर अटकेत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा