मूल पळवणाऱ्या महिलेला अटक, आठवड्यातील दुसरी घटना

डोंगरी परिसरात राहणाऱ्या पूनम यादव या त्यांच्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन शुक्रवारी सकाळी जे.जे.रुग्णालयात गेल्या होत्या. रुग्णालयात नाव नोंदणी करण्याच्या रांगेत पूनम उभ्या असताना त्यांचा मुलगा जवळच खेळत होता.

मूल पळवणाऱ्या महिलेला अटक, आठवड्यातील दुसरी घटना
SHARES

मुंबईच्या शिवाजीनगर परिसरात मूल चोरणाऱ्या महिलेवर जमावाने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, जे. जे. रुग्णालयातून चार वर्षाच्या मुलाला पळवून नेणाऱ्या महिलेला जे.जे.मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. शबनम (४५) असं या महिलेचं नाव आहे. रुग्णालयातील सीसीटिव्ही फुटेजमुळे आरोपी महिलेला शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे.  

डोंगरी परिसरात राहणाऱ्या पूनम यादव या त्यांच्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन शुक्रवारी सकाळी जे.जे.रुग्णालयात गेल्या होत्या. रुग्णालयात नाव नोंदणी करण्याच्या रांगेत पूनम उभ्या असताना त्यांचा मुलगा जवळच खेळत होता. रांगेत असलेल्या पूनम यांची मुलावरून नजर हटल्याचं पाहून शबनमने मुलाला चाॅकलेटचं आमीष दाखवून पळवून नेलं. बऱ्याच वेळाने मुलगा जवळपास कुठे दिसत नसल्याने पूनम त्याचा शोध घेऊ लागल्या. रुग्णालय परिसरात शोध घेऊनसुद्धा मुलगा न सापडल्याने पूनम यांनी पोलिस नियंत्रण कक्षाकडे मदत मागितली. त्यावेळी जे.जे.मार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

घटनेचं गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुतार, उपनिरीक्षक घेवडेकर यांच्या पथकाने तपास सुरू केला. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला आणि तिच्यासोबत असलेला अल्पवयीन मुलगा त्या मुलाला चाॅकलेट भरवत घेऊन जात असल्याचं दिसून आलं. महिलेने रुग्णालयाबाहेरूनच टॅक्सी केल्याने पोलिसांनी सीसीटिव्हीद्वारे तिचा पाठलाग केला. त्यावेळी महिला टॅक्सीतून रे रोड येथील दारूखाना परिसरात उतरल्याचं दिसून आलं. पोलिसांनी दारूखाना परिसरातून शबनमला ताब्यात घेत मुलाची सुटका केली.  या प्रकरणी जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.



हेही वाचा -

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एकाला चिरडले

नवरात्रौत्‍सव निमित्त मुंबई पोलीस सज्ज




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा