पोलिसांनी आवळल्या जादूगार टोळीच्या मुसक्या


पोलिसांनी आवळल्या जादूगार टोळीच्या मुसक्या
SHARES

नाव..जादूगार टोळी, काम..जादू नाही तर जादूच्या नावाखाली चोरी करणे. 'धूर जा रही है' हा या टोळीचा कोडवर्ड. एकदा का हा कोडवर्ड ऐकायला मिळाला, की सगळे सतर्क होतात आणि मग प्रवाशांना भर रस्त्यात लुटतात. लूट झालेल्या व्यक्तीला कळूही देत नाहीत की त्यांचे सामान नक्की कोणी चोरले. पण हे ऐकून तुम्ही धसका घेऊ नका. कारण आता जीआरपीच्या वांद्रे लोकल क्राईम ब्रांच (एलसीबी) कडून कारवाई सुरू झाली आहे.

पोलिसांनी आतापर्यंत या टोळीतील सचिन बाबू कुंचीकर्वे उर्फ सत्या, निखील पप्पू देवाल उर्फ नवाब, महमद आदम दायतर उर्फ बटला, जबीर अली साबीर अली सय्यद यांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पण या टोळीतील म्होरक्यासह त्याचे अन्य पाच साथीदार मात्र फरार आहेत.

काही महिन्यांपासून या टोळीने मालाड परिसरात दहशत माजवून ठेवली होती. अवघ्या काही दिवसांत या टोळीने कित्येक प्रवाशांना अगदी भर रस्त्यात लुटले होते.


का म्हणतात जादूगार टोळी?

या टोळीचे नुसते नाव जादूगार टोळी नाही तर, यांची चोरी करण्याची पद्धतच जणू एखाद्या जादूगारासारखी आहे. मुंबईच्या मालाड सारख्या ठिकाणी जिथे सोने आणि हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांची ये-जा असते, तिथे हे सगळे एकत्र जमतात. पण आपण एकत्र आहोत असे मात्र कोणाला समजू देत नाहीत. त्यानंतर हे आपले सावज हेरतात. एखादी पिशवी किंवा बॅग घेऊन जाणारा प्रवासी रस्त्यातून एकटा जाताना दिसला की ते एकमेकांना इशारे करतात.

'धूर जा रही है' हा त्यांचा कोड वर्ड आहे. एकदा का हा संदेश मिळाला की हे सगळे सतर्क होतात आणि सावजाचा पाठलाग सुरू करतात. त्याचवेळी काही लोक ज्या व्यक्तीला लुटायचे आहे त्याच्या पुढे चालतात तर, उर्वरित सगळे त्याच्या मागून. त्यानंतर टोळीतील एक चोर त्या प्रवाशाची बॅग जोरात ओढतो. प्रवाशाच्या डोळ्याचे पाते लवते न लवते तोच हा चोर ती बॅग आपल्या साथीदाराला देतो. हा साथीदार तात्काळ ही बॅग आपल्या पिशवीत टाकतो आणि पुढे निघून जातो. हे सगळे एवढ्या जलद होते की ज्याची बॅग असते, त्याला काही समजत देखील नाही. तो इथे तिथे बघतो, पण बॅग नेमकी कोणी चोरली हे त्याला समजूनच येत नाही. काही वेळा या टोळीतील इतर चोरटे बॅग चोरी झालेल्या प्रवाशाला चुकीच्या व्यक्तीकडे बोट दाखवून पळून जातात.

एकट्या मालाडमध्ये या टोळीने गेल्या काही दिवसात याच प्रकारे तिघांना लक्ष्य केले होते. 3 ऑगस्टला मालाड येथून जाणाऱ्या हितेश वकारिया या व्यापाऱ्याची 12 लाखांच्या दागिन्यांनी भरलेली बॅग या टोळीने पळवली होती. त्याआधी देखील दोघा प्रवाशांना त्यांनी लक्ष्य केले होते.


कसा लागला छडा?

वारंवार एकाच पद्धतीने चोऱ्या होत असल्याचे लक्षात येताच यामागे एकच टोळी कार्यरत असल्याचा संशय एलसीबीला आला. त्यानंतर त्यांनी तपास आपल्या हाती घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काही पुरावे देखील एलसीबीच्या हाती लागले. काही दिवसांपूर्वी ही टोळी पुन्हा एकदा मालाडमध्ये चोरी करण्याच्या हेतूने येणार असल्याची खबर एलसीबीला लागली होती. त्यामुळे त्यांनी सापळा रचून टोळीला अटक केली. सध्या चौघांना एलसीबीने अटक केली असली तरी सुफियन निसार शेख उर्फ टीपू आणि त्याचे पाच साथीदार फरार आहेत.



हेही वाचा - 

जादूगार पोलीस

खाकीतल्या पोलिसांना करावं लागतंय वाहतूक पोलिसांचं काम!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा