Advertisement

खाकीतल्या पोलिसांना करावं लागतंय वाहतूक पोलिसांचं काम!


खाकीतल्या पोलिसांना करावं लागतंय वाहतूक पोलिसांचं काम!
SHARES

मुंबईच्या रस्त्यावर कार किंवा बाईक चालवताना वाहतूक पोलिसांच्या जागी खाकी वर्दीतील पोलिसांनी तुम्हाला मध्येच रोखून तुम्ही हेल्मेट का घातलं नाही? सीट बेल्ट का लावला नाही? तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स दाखवा, पीयूसी संपलाय? दंड भरा, इन्शुरन्स कुठं आहे? अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती केल्याचं आठवत असेल.

मुख्य रस्त्यांप्रमाणेच गल्लोगल्ली नाकाबंदीदरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या खाकी वर्दीतील पोलिसांना बघून तुम्हाला "मुंबईतील वाहतूक नियमनाची जबाबदारी वाहतूक पोलिसांच्या जागी गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या खाकी वर्दीतील पोलिसांना दिली आहे का?'' असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे.

याचा जितका मनस्ताप तुम्हाला सहन करावा लागतो, त्याहून कित्येक पटीने अधिक मनस्ताप ही अतिरिक्त जबाबदारी झेलणाऱ्या पोलिसांना सहन करावा लागत असल्याचं सध्याचं चित्र आहे.

विधानभवन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांनी एका सामान्य पोलिसाला रस्त्यावरील वाहतुकीचं नियमन करण्याची विनंती केली असता, या पोलिसानं ही आपली जबाबदारी नाही, असं म्हणत त्यांची विनंती धुडकावून लावली. त्यानंतर आ. कदम यांनी थेट रस्त्यावर बैठक मारत या प्रकाराचा निषेध नोंदवला. त्यामुळे तब्बल अर्धा तास झालेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक भरडला गेला. हे या मनस्तापाचं ताजं उदाहरण म्हणता येईल.


पोलिसांच्या जबाबदारीची विभागणी

तसं पाहायला गेलं तर कायद्याचं रक्षण करणं ही सर्वच पोलिसांवरील मुख्य जबाबदारी असते. मात्र त्यातही पोलीस कर्मचारी वा अधिकाऱ्याची नेमणूक कुठल्या विभागात करण्यात आली आहे, त्यानुसार त्यांच्यावरील जबाबदारी ठरते. उदा. वाहतूक, पीसीआर, पोलीस ठाणे इ. विभागातील पोलिसांवरील जबाबदारी वेगवेगळी असते. हत्यारी आणि बिनहत्यारी पोलीस अशी ढोबळ मानाने विभागणी झालेली असते. 

खाकी वर्दीतले पोलीस समाजात कायदा आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवतानाच तक्रारींनुसार गुन्ह्याचा तपास करणं, गुन्हेगारांना पकडणं आदी कर्तव्य निभावतात. शहरातल्या रस्त्यांवर गस्त घालताना काही आक्षेपार्ह, बेकायदेशीर आढळलं तर त्याची दखल घेऊन योग्य कारवाई करणं हे काम गस्ती घालणाऱ्या पोलिसांना अर्थात बिट मार्शल्सना नेमून दिलेलं आहे. तर वाहतूक पोलीस वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवताना वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्याला पकडतात वा त्याच्याकडून नियमानुसार दंड वसूल करतात. पण आताशा बीट मार्शल वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मदत करताना, वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना मुंबईच्या रस्त्यावर जास्त दिसायला लागला आहे. बीट मार्शल्सची इच्छा असो वा नसो, त्यांना वाहतूक नियोजनाचं काम करावंच लागतं. कारण? अर्थातच हुकुमावरून. 


दंडाचं टार्गेट पूर्ण करावंच लागतं

सामान्य पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्यावर विभागानुसार भिन्न जबाबदाऱ्या असणं आवश्यक असताना सामान्य पोलिसांना उन्हातान्हात उभं करून त्यांच्याकडून वाहतूक नियमनाच्या कामात ढकलण्यात आल्यानं या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यातही वाहतूक पोलिसांना वाहनचालकांकडून लक्ष्य करण्यात येत असल्यानं त्यांचा मनस्ताप आणखी वाढला आहे.

"कित्येकदा आम्हाला पावत्यांचं पुस्तक दिलं जातं, दिलेल्या पावत्या जोवर संपत नाही, तोवर आमची सुटका होत नाही. बऱ्याचदा आमच्यावर एवढा दबाव असतो की वाहनचालकांच्या लहानसहान कारणांवर देखील पावत्या फाडाव्या लागतात. यावरून वाहन चालकांच्या रागालाही तोंड द्यावं लागतं. उदा. एखादा वाहनचालक दूध, भाजी किंवा दैनंदिन गरजेच्या वस्तू आणायला घरापासून हाकेच्या अंतरावर बाईकवरुन जात असताना बहुतेक वेळेस हेल्मेट घालत नाही. अशा वेळी त्याला अडवल्यावर तो स्वाभाविकपणे चिडतो. आम्हालाही त्याचं म्हणणं पटत असलं, तरी नियमानुसार दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी कारवाई करावीच लागते. पण असं केल्यावर नागरिक देखील नाराज होतात,'' असं एका पोलीस कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.


पोलीस प्रशासनाचं काय आहे म्हणणं ?

प्रत्येक पोलिसाला वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्यात वाहतूक पोलीस आणि खाकी वर्दीतले सामान्य पोलीस असा काहीही फरक नाही.

रश्मी करंदीकर, प्रवक्त्या, मुंबई पोलीस


सामान्य पोलिसांवर वाहतुकीची जबाबदारी का?

सध्या मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यांवर विकासकामं सुरु आहेत. मेट्रोच्या कामांमुळे पश्चिम उपनगरातील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि लिंकिंग रोडवर प्रचंड वाहतूककोंडी होते. त्याशिवाय वीज, जलवाहिनीसाठी रस्ते खोदणे, काँक्रिटीकरण इ. कामांमुळेही वाहतुकीच्या समस्येला मुंबईकरांना सामोरं जावं लागतं. पावसाळ्या खड्ड्यांची संख्या वाढत असल्याने वाहतुकीच्या कोंडीत वाढ होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा बहुतांश वेळ वाहतुकीचं नियमन करण्यात खर्च होतो.

पोलीस वाहतुककोंडी सोडवण्यात व्यस्त असल्याचं बघून वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करतात. त्यातच विनाहेल्मेट गाडी चालवताना एखाद्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर पुन्हा वाहतूक पोलिसांनाच दोषी ठरवलं जातं. या वादापासून दूर राहण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला खाकी वर्दीतील पोलिसांना देखील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर 'मुंबई लाईव्ह'ला सांगितलं.

महिलांवर होणारे अत्याचार, हत्या, खंडणी, अपहरण यांसारख्या गुन्ह्याचं प्रमाण शहरात प्रचंड वाढलेलं असताना, गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांना केवळ दंडाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उभं करून पावत्या फाडून घेणं किती योग्य? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे.



हे देखील वाचा -

पोलिसच झाले दरोडेखोर, चोरले २४ लाखांचे हिरे



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा