Advertisement

बापरे! आमदार चिडले आणि रस्त्यावर बसले


बापरे! आमदार चिडले आणि रस्त्यावर बसले
SHARES

आपला निषेध नोंदवण्यासाठी विधानभवनच्या पायऱ्यांवर बसलेले लोकप्रतिनिधी पाहण्याचा योग प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि शासकीय कामासाठी विधानभवन परिसरातयेणाऱ्या लोकांना अनेकदा आला असेल. मात्र, ऐन रहदारीच्या वेळी विधानभवनच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रस्त्याच्या मधोमध बसलेले लोकप्रतिनिधी अनेकांना पहायला मिळाले. या लोकप्रतिनिधीने  आमदारकीची इभ्रत अक्षरशः रस्त्यावर आणली. हे आमदार महोदय म्हणजे संजय कदम. दापोलीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार संजय कदम यांनी आपल्या हट्टाखातर वाहतूकीची कोंडी करून शेकडो वाहनचालकांना सुमारे अर्धा तास जेरीस आणलं.   


हम करे सो कायदा


महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवन परिसरात दाखल होत असताना संजय कदम यांनी रस्त्यावर बैठक मांडली. त्यांनी अचानक घेतलेल्या पवित्र्यामुळे नेमकं काय झालंय? हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. भर रस्त्यात ठाण मारणाऱ्या संजय कदम यांच्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. एरवी अधिवेशनकाळात हॉर्नमुक्त असणारा विधानभवन इमारतीबाहेरच्या रस्त्यावर गाडीचालकांच्या हॉर्नचे कर्कश्श आवाज ऐकू येत होते. बराच वेळ हा प्रकार चालला.


त्याचं असं झालं. विधानभवनाबाहेर ड्युटीवर असलेले पोलीस दिमतीला न आल्यामुळे आमदार महोदयांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी आपल्या पद्धतीने निषेध नोंदवला. मात्र, या प्रकरणात स्वतःचा दोष असल्याचं त्यांना मान्य नाहीच.


मी विधानभवनात दाखल होत असताना बाहेरच्या रस्त्यावर स्पीडने गाड्या येत-जात होत्या. माझ्या अंगावर एखादी गाडी येऊ नये, याची काळजी मी घेत होतो. पण ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी पोलीस असले तर मदत होईल असं मला वाटलं. म्हणून मी तिथे ड्युटीवर असलेल्या रमेश चौधरी नावाच्या पोलीसाला बोलावलं. पण आपली ड्युटी इथे, झाडाखाली आहे असं म्हणत त्याने ट्रॅफिक कंट्रोल करायला नकार दिला. म्हणून मी हा निर्णय घेतला.


संजय कदम


आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस


नागरिक संतप्त

आमदारकीचं आयुध हाती असलेल्या व्यक्तीनेच असला प्रकार करावा, याबाबत नागरिकांनी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे. रहदारीची कोंडी करणाऱ्या आणि वाहनचालकांचा खोळंबा करणाऱ्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या प्रकारात हकनाक त्रास भोगावा लागलेल्या विशेष सेठ या नागरिकाने केली. 


वादग्रस्त आमदार

संजय कदम हे वादग्रस्त आमदार आहेत. राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याविरोधातला संजय कदम यांचा 'कदम विरुद्ध कदम' असा संघर्ष चांगलाच गाजला. रामदास कदम यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी करणाऱ्या संजय कदम यांच्याविरोधात रामदास कदम यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत पलटवारही केला. विशेष म्हणजे जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय कदम यांच्यावरच आहे.


दरम्यान, हे प्रकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवारयांच्यापर्यंत नेण्यात आल्याची माहिती ‘मुंबई लाइव्ह’ला मिळाली आहे. घडलेला प्रकार विधानभवन परिसरातला नसला तरी प्रवेशद्वाराबाहेरच्या रस्त्यावरच घडला असल्याने घटनेचं गांभीर्य संबंधित ओळखतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा