मुंबईत फिरतायत अनेक नीरव मोदी!


मुंबईत फिरतायत अनेक नीरव मोदी!
SHARES

खोटी कागदपत्रे आणि हमीपत्र सादर करून बँकांना कोट्यावधी रुपयांना गंडवणाऱ्या नीरव मोदी प्रमाणे मुंबईत अनेक छोटे मोठे नीरव मोदी वावरत आहेत. बँकांना खोटी कागदपत्रे आणि हमी पत्र देऊन त्यांच्याकडून पैसे स्विकारून त्याचा अपहार केल्याच्या घटनेत आता दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरूदत्त घवाळकर (४६) याला खोटी हमीपत्र देऊन बँकेला दीड कोटींना गंडवल्याप्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने गुरूदत्तला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


कसे लुबाडले बँकेला?

अंधेरीच्या मरोळ परिसरात राहणाऱ्या गुरूदत्तने ८ फेब्रुवारी २००८ मध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेच्या मेकर टॉवर येथील कार्यालयात कर्जासाठी अर्ज कला होता. या कर्जासाठी त्याने त्याची पत्नी पल्लवी घवाळकर हिच्या नावावर असलेल्या मरोळ येथील घराची कागदपत्र हमी म्हणून बँकेकडे दिली होती. त्यानुसार बँकेने त्याला ७५ लाख रुपयांचे कर्ज दिले. हे पैसे घवाळकरने बँकेने दिलेल्या तारखेत परतही केले.

२९ मे २००९ मध्ये गुरूदत्तने बँकेकडे लेटर ऑफ क्रेडिटसाठी पुन्हा २ अर्ज केले. त्यावेळी त्याने पुण्यातील कोणार्क आगार येथील महालक्ष्मी मेटल सर्व्हे यांच्याकडून अॅल्युमिनियम मटेरियल खरेदीसाठी ४० लाख आणि ३५ लाखांची मागणी केली. त्यानुसार बँकेने त्याला पुन्हा ७५ लाखांचे पेमेंट केले. बँकेने घवाळकर यांनी दिलेल्या हमीपत्राची चौकशी केली. त्यावेळी दोन्ही कागदपत्रे ही बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार इंडियन ओव्हरसीज बँकेचे चीफ मॅनेजर रमेश सिरसीकर यांनी गुन्हा दाखल केला.


मित्रांच्या नावाने सुरू केल्या कंपन्या

पोलिस चौकशीत घवाळकर याने व्यवसाय करण्यासाठी चांगली रक्कम मिळावी, यासाठी विविध मेटल कंपन्यांची स्थापना केली. या सर्व कंपन्या त्याने नातेवाईक आणि मित्रांच्या नावाने सुरू केल्या होत्या. मात्र त्यांचे व्यवहार घवाळकरच हाताळात असल्याचे प्रत्यक्षदर्शी समोर आले. घवाळकरने पुण्यात महालक्ष्मी मेटल सर्व्हे, तर अंधेरीच्या मरोळ परिसरात क्रिस्टल कॉर्पोरेशन व फ्रीस्टाईल असो. प्रा. लि. कंपन्या असल्याचे भासवले. तर युसूफ पटेल या मित्राच्या नावाने दोन कंपन्या स्थापन करून मेटल खरेदी विक्रीसाठी त्या व्यवसायांची खोटी हमीपत्र बँकांकडे सादर करून तब्बल दीड कोटी रुपये उकळले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घवाळकरला ३ मे रोजी अंधेरीतून अटक केली.


बनावट कागदपत्रे कशी बनवली?

घवाळकरने ही कागदपत्रे कशी बनवली? या गैर व्यवहारात त्याला कुणी कुणी सहकार्य केले? या सगळ्याची चौकशी होणे बाकी असल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयाकडे घवाळकरला पोलिस कोठडी मिळावी यासाठी विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने ७ मे पर्यंत घवाळकरला पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा

गर्लफ्रेंडसमोर अपमान करणे वकिलाला पडलं महाग


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा