विलेपार्ले ठाण्यातील पोलिसांच्या गणवेशातील बाप्पा ठरतोय सर्वांचे अाकर्षण


विलेपार्ले ठाण्यातील पोलिसांच्या गणवेशातील बाप्पा ठरतोय सर्वांचे अाकर्षण
SHARES

मुंबईत गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या अनुषंगाने विलेपार्ले पोलिस ठाण्याचा ताबा खाकी वर्दीत अवतरलेल्या गणपती बाप्पाने घेतला आहे. त्यामुळे पोलिस गणवेशातील हा बाप्पा सर्वांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे. विलेपार्ले पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी आपल्या घरी पोलिस गणवेशातील ही मूर्ती बसवली असून विलेपार्ले पोलिस ठाण्याचा हुबेहूब देखावा त्यांनी घरी साकारला आहे. सण-उत्सवादरम्यान नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असणाऱ्या पोलिसांना उदंड आयुष्य लाभू दे, अशीच प्रार्थना त्यांनी पोलिस बाप्पाजवळ केली आहे.


बाप्पांच्या माध्यमातून जनजागृती

गणेशोत्सवादरम्यान बाप्पाची वेगवेगळी रुपे आपण बघितली असतीलच. पण विलेपार्लेच्या एका पोलिस अधिकाऱ्याने आपल्या घरी बाप्पाची चक्क पोलिस गणवेशातली मूर्ती स्थापन केली आहे. या मूर्तीद्वारे जनजागृती करण्याचा या अधिकाऱ्याचा उद्देश आहे. मागील वर्षी ही काणे यांनी अशाच प्रकारे पोलिस गणवेशातील मूर्ती साकारली होती. मात्र दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान एका व्हिडिओ चित्रफीतीद्वारे ते सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात.


पोलिसांवरील हल्ल्याबाबत संदेश

गेल्या वर्षी शहरातील वाहतूककोंडी आणि समस्या यावर चित्रफित बनवण्यात आली होती. यावर्षी पोलिसांवर होणारे हल्ले या पार्श्वभूमीवर नागरिक आणि पोलिसांमध्ये सुसंवाद घडावा, या दृष्टिकोनातून 'पोलिस दादा' या थीमवर गणपतीची स्थापना त्यांनी केली आहे. सध्या सोशल मीडियावरही हा 'पोलिस दादा गणपती' सर्वांचे आकर्षण ठरला आहे.


असा अाहे पोलिस दादा गणपती

राजेंद्र काणे यांनी त्यांच्या अंधेरी येथील घरात पोलिस वेशातील बाप्पांची मूर्ती आणि देखावा साकारला आहे. पोलिस ठाण्यात लाकडी खुर्चीवर बसलेल्या गणरायाची मूर्ती, ज्यांच्या कंबरेला पिस्तुलदेखील लावली आहे. विशेष म्हणजे बाप्पाच्या यूनिफॉर्मवरील नावाच्या पाटीवर चक्क श्री गणेश असा उल्लेख केला आहे. बाप्पांचा देखावा हादेखील खाकी वेशातील बाप्पांना साजेसा असाच म्हणजे पोलिस स्थानकाचा आहे.


हेही वाचा -

एटीएसने पांगारकरच्या मित्राला घेतलं ताब्यात

परवानगी नसलेल्या मंडळांवर पालिकेची कारवाई



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा