धारावीतल्या चार शोरूमवर पोलिसांचा छापा


धारावीतल्या चार शोरूमवर पोलिसांचा छापा
SHARES

धारावीतल्या सायन वांद्रे लिंक रोडवरील चामड्याच्या वस्तू विकणाऱ्या 4 शोरूमवर एका कॉपीराईट कंपनीने धारावी पोलिसांसह शनिवारी छापा मारला. या छाप्यात अमेरिकन लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे लोगो असलेले 4 लाख 91 हजार रुपयाचे चामडी बेल्ट आणि वॉलेट जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी शाहरुख तंजमूल अन्सारी, नफीज इब्राहिम शेख, शाहबाज मोहम्मद लतीफ कुरेशी यांना धारावी पोलिसांनी अटक केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून धारावीतल्या सुप्रसिद्ध चामडे बाजारात लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे लोगो एंबॉसिंग करून चामडी बेल्ट आणि वॉलेट मोठ्या प्रमाणात विकत असल्याची माहिती लेव्ही स्ट्रॉस कंपनीच्या अधिकृत नेत्रिका कॉपीराईट कंपनीला मिळाली होती. त्याअनुषंगाने कॉपीराईट कंपनीचे अधिकारी नरेश म्हेत्रे यांनी धारावीतील काही दुकानांवर पाळत ठेवून परिमंडळ -5 येथे तक्रार अर्ज दाखल केला होता.

तपास सुरू असताना नॅशनल गुड्स, अरमान लेदर आर्ट्स, मास लेदर शॉप, शाकरा लेदर आर्ट्स या मोठमोठ्या शोरूममध्ये लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे लोगो अनधिकृतरित्या एंबॉसिंग करून चामड्याचे बेल्ट आणि वॉलेट मोठ्या प्रमाणात विकत असल्याने दिसून येताच कॉपीराईट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह धारावी पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल गायकवाड़ आणि पथकाने एकाच वेळी चार दुकानांवर छापा मारला. यावेळी लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे लोगो एंबॉसिंग असलेले 150 बेल्ट आणि 260 वॉलेट सापडले. धारावी पोलिसांचा छापा पडताच शोरूम चालकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यावेळी शोरूम मालकांनी आपला माल अधिकृत असल्याचा दावा करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. मात्र कॉपीराईट कंपनीचे अधिकारी नरेश म्हेत्रे यांनी त्यांचे पितळ उघडे पाडले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा