अंबानी कुटुंबियांनी मानले मुंबई पोलिसांचे आभार, म्हणाले…

अंबानी कुटुंबियांनी मुंबई पोलिसांवर विश्वास दाखवत त्यांचे आभार मानले आहेत.

अंबानी कुटुंबियांनी मानले मुंबई पोलिसांचे आभार, म्हणाले…
SHARES

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख आणि नामांकीत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील अँटिलिया या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली एक कार बुधवारी मध्यरात्री आढळून आली हाेती. यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे आपल्या हाती घेत चौकशीला सुरूवात केली. त्यातून काही धागेदोरे देखील मुंबई पोलिसांच्या (mumbai police) हाती लागल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान अंबानी कुटुंबियांनी मुंबई पोलिसांवर विश्वास दाखवत त्यांचे आभार मानले आहेत.

मुंबई पोलिसांनी तातडीने आणि जलद गतीने निर्णय घेत केलेल्या कारवाईबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्हाला विश्वास आहे की या प्रकरणामध्ये पोलीस लवकरच वेगाने त्यांचा तपास पूर्ण करतील,” असं रिलायन्स इंडस्ट्रीजने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा- मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्यामागे इंडियन मुजाहिद्दीन?, कनेक्शनचा शोध सुरू

मुकेश अंबानी (mukesh ambani) यांच्या निवास्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली एक स्काॅर्पिओ गाडी बुधवारी मध्यरात्री उभी करण्यात आली होती. या गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्या कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सोबतच एक पत्रही या गाडीत आढळून आलं आहे. या पत्रातून नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है, अशी धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर अंबानी यांच्या घराबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. या तपासासाठी १० पथकं तयार करण्यात आली आहेत. ही सर्व पथकं परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणे, संशयास्पद लोकांची माहिती मिळवण्याच्या कामाला लागली आहेत. 

कार चेसीस क्रमांकाद्वारे गाडी मालकापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं असून ही कार काही दिवसांपूर्वीच विक्रोळीतून चोरीला गेल्याचीही माहिती पुढं आली आहे. शिवाय कार पार्क करणारी एक व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आली असून संबंधित व्यक्तीने मास्क घातल्याने आणि डोकं हुडीने झाकल्याने त्याची ओळख पटू शकलेली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

(reliance industries and mukesh ambani family thanks mumbai police)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा