धक्कादायक! प्रजासत्ताकदिनी अॅसिड हल्ल्याचा होता कट

मंगळवारी ताब्यात घेण्यात आलेल्या नऊ जणांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे ९ जण इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित पाॅप्युलर फ्रन्ट आॅफ इंडिया संघटनेसाठी काम करत असल्याचं समोर आलं आहे. तर २६ जानेवारीला, प्रजासत्ताकदिनी अॅसिड आणि केमिकल हल्ला करण्याचा त्यांचा कट असल्याचंही उघड झालं आहे.

धक्कादायक! प्रजासत्ताकदिनी अॅसिड हल्ल्याचा होता कट
SHARES

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथका (एटीएस)नं मंगळवारी दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून ताब्यात घेतलेल्या ९ जणांकडून मिळालेल्या साहित्यातून आणि माहितीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हे ९ जण इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित पाॅप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया संघटनेसाठी काम करत असल्याचं समोर आलं आहे. तर २६ जानेवारीला, प्रजासत्ताकदिनी अॅसिड आणि केमिकल हल्ला याशिवाय जेवणातून विष प्रयोग करण्याचा त्यांचा कट असल्याचंही उघड झालं आहे. मात्र एटीएसच्या सर्तकतेमुळे वेळीच या ९ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून एक मोठा कट एटीएसने उधळून टाकला आहे. त्यामुळे एटीएसची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आणि मोठी कारवाई मानली जात आहे.

मुंब्रा आणि औरंगाबादमधून अटक

सोशल मिडियाच्या माध्यमातून तरूणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या तरूणांचा शोध घेत त्यांच्यावर करडी नजर ठेवली होती. त्यानंतर मंगळवारी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी मुंबईजवळच्या मुंब्रा कौसा अमृनगर आणि औरंगाबादमध्ये कारवाई करत ९ जणांना ताब्यात घेतलं आहे. चार जणांना मुंब्रा येथून तर पाच जणांना औरंगाबादमधून एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. मुंब्रा येथून ताब्यात घेण्यात आलेले मोहम्मद मजहर शेख, मोहसिन खान, फहाद शाह आणि आणखी एक जण असे चौघे औरंगाबादला निघाले असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

साहित्य जप्त

अटक करण्यात आलेले ९ ही संशयित तरूण उच्चशिक्षित असून त्यांना उत्तम संगणकीय ज्ञान असल्याचं समोर आलं आहे. आरोपींपैकी दोन जण इंजिनियर असून एक फार्मासिस्ट आहे. त्यांच्याजवळून एटीएसनं लॅपटाॅप, मोबाईल, केमिकल्स आणि अॅसिड असा मोठा साठा जप्त केला आहे. तर महत्त्वाचं म्हणजे राज्यात प्रजासत्ताकदिनी ठिकठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाची यादी, इलेक्ट्राॅनिक गॅजेट, चाकू अशी साहित्यही आढळून आली आहेत. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी राज्यात घातपाताचा मोठा कट दहशतवाद्यांनी या तरूणांच्या माध्यमातून आखल्याचं एटीएसच्या निदर्शनास आल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

दरम्यान गेल्या महिन्यात एनआयएनं दिल्लीतील जाफराबाद आणि उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये इसिसशी संपर्कात असलेल्या १६ ठिकाणांवर छापे घातले होते. एनआयएसह उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं केलेल्या या मोठ्या कारवाईत, शोध मोहिमेतही यांची नावं पुढे आली होती.


हेही वाचा -

महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सीसीटीव्हीचं जाळं आता आणखी मजबूतसंबंधित विषय