सोनिया गांधींवर टीका, अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांची नोटीस

रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी (Journalist arnab goswami) यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

सोनिया गांधींवर टीका, अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांची नोटीस
SHARES

रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी (Journalist arnab goswami) यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याबद्दल राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही नोटीस (enquiry notice from mumbai police) बजावली आहे. 

मुंबई पोलिसांनी आपल्याला मागील १२ तासांमध्ये दोन नोटीस बजावत चौकशीसाठी बोलावल्याची माहिती गोस्वामी यांनीच आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी आपण पोलिसांसमोर हजर राहून चौकशीला सहकार्य करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.  

हेही वाचा- अर्णब गोस्वामी यांच्यावर हल्ला, काँग्रेसवर केले गंभीर आरोप

ठिकठिकाणी तक्रारी 

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात (palghar mob lynching) जमावाने दोन संत आणि त्यांच्या ड्रायव्हरची दगड आणि लाठ्यांनी हत्या केली होती. यावर आपल्या वृत्तवाहिनीवर चर्चा करताना अर्णब गोस्वामी यांनी सोनिया गांधी (congress president sonia gandhi) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोस्वामी यांच्याविरोधात ठिकठिकाणी तक्रारी दाखल केल्या. नितीन राऊत यांनीही नागपूर इथं गोस्वामींविरोधात कलम ४१अ अंतर्गत फिर्याद दाखल केली होती. 

एफआयआर मुंबईत वर्ग

त्यानंतर गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता, नागपूर येथील एफआयआर वगळता त्यांच्यावरील इतर सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या. हा एफआयआर मुंबईतील ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात वळवण्यात आला आहे. शिवाय पुढील दोन आठवड्यापर्यंत गोस्वामी यांना कुठल्याही कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देतानाच न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीला पोलीस संरक्षण देण्याचे आदेशही मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. गोस्वामी यांनाही तपास संस्थांशी सहकार्य करण्यासही सांगितलं आहे.

हेही वाचा- पालघर हत्याप्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवा, हायकोर्टात याचिका

हल्ल्याचा आरोप

दरम्यान मुंबईमधल्या ऑफिसमधून घरी परतत असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी आपल्यावर हल्ला केल्याचा दावा अर्णब गोस्वामींनी केला होता. गोस्वामी यांच्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली दोन काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचंही म्हटलं जात आहे. याप्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा