सुटकेसाठी अर्णब गोस्वामींची सर्वोच्च न्यायालयात धाव

अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर अर्णब यांनी आता सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

सुटकेसाठी अर्णब गोस्वामींची सर्वोच्च न्यायालयात धाव
SHARES

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी तुरूंगात असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर अर्णब यांनी आता सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामिनाच्या अर्जावर दिलेल्या आदेशाला गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली होती. सत्र न्यायालयाने त्यांच्या जामिनावर तातडीची सुनावणी करण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. संबंधित याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सलग ३ दिवस सुनावणी झाली.

(republic tv editor arnab goswami moves supreme court for bail in anvay naik suicide case)

हेही वाचा- अर्णब गोस्वामींना जामीन नाहीच, उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज

या सुनावणीत अर्णब गोस्वामी यांच्यावर केवळ कुहेतूने कारवाई करण्यात येत असल्याने आरोपीच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं आणि मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत आहे. त्यामुळे आरोपीच्या सुटकेचा अंतरिम दिलासा देणारा आदेश करावा. न्यायालयाला दिवाळीची सुट्टी लागेल आणि अर्णब यांना जामीन मिळू शकणार नाही, याची सरकारला जाणीव होती. त्यामुळेच त्यांना धडा शिकवण्यासाठी अटक करण्यात आली, असा युक्तीवाद अर्णब गोस्वामी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी केला होता.

त्यावर आमचे विशेषाधिकार वापरून तातडीचा अंतरिम जामीन देण्याचं हे प्रकरण नाही. त्यामुळे आरोपी कनिष्ठ न्यायालयात जाऊ शकतो. कनिष्ठ न्यायालय ४ दिवसांच्या कालावधीत त्यावर निर्णय घेईल, असं म्हणत उच्च न्यायालयाने त्यांच्या जामिनाची मागणी फेटाळून लावली. सोबतच न्यायालयाने या प्रकरणातील सहआरोपी नितीश सारडा आणि फेरोज शेख यांचीही जामिनाची मागणी देखील फेटाळून लावली.

त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामिनाच्या अर्जावर दिलेल्या आदेशाला गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सध्या अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा