मेकर चेंबर्सच्या ११व्या माळ्यावरून उडी मारत परदेशी नागरिकाची आत्महत्या


मेकर चेंबर्सच्या ११व्या माळ्यावरून उडी मारत परदेशी नागरिकाची आत्महत्या
SHARES

नरिमन पॉइंट येथील मेकर चेंबर्सच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारत एका ३५ वर्षीय परदेशी नागरिकानं बुधवारी आत्महत्या केल्याची घटना घडली अाहे. मृत परदेशी नागरिक रोमानियाचा नागरिक असून तो गोव्याहून मुंबईत रोमानियन दूतावासाकडे मदत मागण्यासाठी आला होता. मात्र मदत न मिळाल्यानं त्याने हे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


गोव्यातून मुंबईत अाला

मूळचा रोमानियाचा नागरिक असलेला हा तरुण मंगळवारी गोव्यातून ट्रॅव्हल्सच्या मदतीनं मुंबईत आला होता. मुंबईतील मेकर चेंबर्समध्ये रोमानियन दूतावासाच्या कार्यालयात तो बुधवारी चौकशीसाठी आला होता. ते आपल्याला मायदेशात परत जाण्यासाठी मदत करतील, असा त्याला विश्वास होता.


गोवेकरांनीही त्याला केली मदत

मुंबईत येण्यासाठीही त्याला गोवेकरांनी मदत केली होती. मुंबईतील रोमानियन दूतावासाचं कार्यालय २००९ मध्येच बंद झाल्याचं त्याला मुंबईत अाल्यावर समजलं. तरीही वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी तो बुधवारी सकाळी मेकर चेंबर्समध्ये गेला होता. प्रत्यक्षात हे कार्यालय कधीच बंद झाल्याचं त्याला समजल्यानंतर यापुढे अापल्याला कोणतीही मदत मिळणार नाही, असं समजून त्याने अात्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.


अात्महत्येपूर्वी खाल्लं सँडविच

आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं मेकर चेंबर्सबाहेरील सँडविचवाल्याकडे जाऊन सँडविच खाल्लं होतं. घाबरलेला हा रोमानियन नागरिक थरथर कापत होता. त्याच्यासोबत काही वाईट घडल्याचं समजत होतं. या घटनेची माहिती रोमानियन दूतावासाला मेलद्वारे कळवण्यात आली आहे. त्याच्या फोटोच्या मदतीने पोलीस त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.


हेही वाचा -

'तुमच्या बंदुकीने मला शूट करा, मी हत्या केलेली नाही'

हाय हिल्स सॅण्डल्समुळे ६ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा