लोकलच्या हँडिकॅप डब्यात चढला अन् फसला... तुम्ही करू नका असं धाडस


लोकलच्या हँडिकॅप डब्यात चढला अन् फसला... तुम्ही करू नका असं धाडस
SHARES

लोकल ट्रेनमध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीत चढणं म्हणजे महाकर्म कठिण काम. त्यामुळं काही महाभाग तुलनेनं कमी गर्दीच्या हँडिकॅपच्या (अपंग प्रवाशांसाठी राखीव) डब्यात चढण्याचं धाडस करतात. काही वेळेस त्यांचा प्रवास सुखाचा होतो, पण टीसीच्या हाती सापडल्यास एका क्षणात सगळी हवा निघून जाते. हँडिकॅपच्या डब्यात प्रवास करण्याचं धाडस एका आरपीएफ अधिकाऱ्याच्या असंच अंगलट आलं आहे. या अधिकाऱ्यावर गुन्ह्याची नोंद झाली असून त्याला २ वर्षांचा तुरूंगवास किंवा १ लाखांपर्यंतचा दंड होण्याची दाट शक्यता आहे.


अपंग अधिकार कायद्यांतर्गत कारवाई

कुर्ला जीआरपीने सागर बोरनारे या अपंग प्रवाशाच्या तक्रारीवर आरपीएफ अधिकारी विजय साळवे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम, २०१६ कलम ९१, ९५ अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अपंग व्यक्तींच्या अधिकारांतर्गत नोंदवलेला अशाप्रकारचा राज्यातला हा पहिलाच गुन्हा आहे.

१ ऑगस्ट रोजी ठाण्याहून घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या हँडिकॅप डब्यात बोरनारे प्रवास करत होते. त्याच डब्यात साळवी देखील प्रवास करत होते. साळवी अपंग नसल्यानं बोरनारे यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल आक्षेप घेतला. परंतु साळवी यांनी उतरण्यास नकार दिल्याने बोरनारे यांनी आरपीएफ कंट्रोल रुमकडं त्यांची तक्रार नोंदवली.



ट्विटरची दखल

आश्चर्याची बाब म्हणजे आरपीएफ कंट्रोल रुमला तक्रार केल्यावर घाटकोपर आरपीएफनं तात्काळ येत हँडिकॅपच्या डब्यातील इतर प्रवाशांवर कारवाई केली. पण साळवी यांना मात्र सोडून दिलं. अखेर बोरनारे यांनी याप्रकरणी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांना ट्विट करत त्यांच्याकडे दाद मागितल्यावर साळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अाला. साळवी यांना केव्हाही अटक होऊ शकते.

त्यामुळं गर्दी असो किंवा कितीही घाईची स्थिती असो, चुकूनही अपंगांच्या डब्यातून प्रवास करू नका. नाहीतर तुम्हीही या कायद्याच्या कचाट्यात येऊन दोन वर्षांकरीता तुरूंगात जाऊ शकता किंवा तुम्हाला १ लाखांचा दंड होऊ शकतो.



हे देखील वाचा -

लाईफ इन्शुरन्स काढताय? मग हे वाचाच!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा