हाजिका अखेर कोमातून बाहेर, अडीच किलोचा तवा पडला होता डोक्यात


SHARE

खासगी शिकवणीनंतर घरी परतत असताना डोक्यात तवा पडून कोमात गेलेली मुंबईतील 8 वर्षांची हाजिका कपाडिया हिला उपचारांनंतर सोमवारी सुखरुप घरी सोडण्यात आले. तिच्या उपचारासाठी जवळपास 10 लाख एवढा खर्च आला आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत उपचारादरम्यान तिला प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. ज्या व्यक्तीमुळे तिला या वेदना सहन कराव्या लागल्या, त्या व्यक्तीने हाझिकाच्या उपचाराची जबाबदारी घ्यावी, असे हाजिकाचे वडील फैझन कपाडिया यांनी म्हटले आहे. त्या व्यक्तीला माफ देखील करू. एवढ्या मोठ्या संकटातून हाजिका वाचली, याचा आनंद आम्हाला आहेच. पण, पोलिसांनी अजूनही त्या व्यक्तीचा तपास केला नाही. हे दुर्दैवी असल्याची भावना कपाडिया फैझन यांनी व्यक्त केली.

मदनपुरा परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत राहणाऱ्या हाजिका हिला आधी उपचारांसाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, नंतर तिला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डोक्यावरच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगून तिला बॉम्बे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सेंट जॉर्ज शाळेत तिसरीत शिकणारी हाजिका नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास क्लासला गेली होती. तिथून सव्वा अकराच्या सुमारास घरी परतत असताना ती मदनपुरा इथल्या जिल्हा टॉवर आणि स्टार इमारतीमधील मोरलेन रोडवर आली आणि अचानक तिच्या डोक्यात अडीच किलोचा तवा पडला. त्यानंतर तिला तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले.


हे देखील वाचा

डोक्यात तवा पडून चिमुरडी गंभीर जखमी


ती आता ठीक आहे, पण अजूनही तिची प्रकृती स्थिर होण्यासाठी तिला मानसिक आणि शारीरिक ताकदीची गरज आहे. तिच्या शरीराचे संतुलन आणि समन्वय सुधारण्यासाठी आणखी काही दिवस फिजीयोथेरेपीची गरज आहे. अडीच किलोचा तवा तिच्या डोक्यात पडल्यामुळे तिच्या डोक्यात मोठी जखम झाली होती. ती चार आठवडे कोमात होती. पण, आता ती तिच्या घरच्यांना ओळखू शकते. तिच्या एमआरआय रिपोर्टप्रमाणे ती आता स्थिर आहे. हाजिकाच्या मेंदूला दुखापत झाली होती. मेंदूत इजा झालेल्या भागाचा तुकडा शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढावा लागणार होता. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करणे फार कठीण होते.

- डॉ. केकी तुरेल, न्युरोसर्जन, बॉम्बे हॉस्पिटल

संबंधित विषय
ताज्या बातम्या