व्हाॅट्स अॅपमुळं सापडला अाजोबांचा ठावठिकाणा

व्हाॅट्स अॅपवरील पोस्टमुळे चार महिन्यापूर्वी मुंबईतून बेपत्ता झालेले आजोबा पुन्हा त्यांच्या कुटुंबाकडं सुखरूप पोहोचले.

व्हाॅट्स अॅपमुळं सापडला अाजोबांचा ठावठिकाणा
SHARES

व्हॉटस अॅपवर अमुक बेपत्ता मुलगा सापडला... तमुक मुलगी सापडली अशा पोस्ट आपण अनेकदा पाहतो. त्यामध्ये कितपत तथ्य असतं, याचा पाठपुरावा कोणी फारसं करत नाही. पण केवळ अशा पोस्टमुळे चार महिन्यापूर्वी मुंबईतून बेपत्ता झालेले आजोबा पुन्हा त्यांच्या कुटुंबाकडं सुखरूप पोहोचले. अवघ्या काही तासात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यातील कर्मचारी अशोक भुजबळ यांच्या सतर्कतेमुळे या अाजोबांना पुन्हा अापलं घर मिळालं.


फेब्रुवारी महिन्यात बेपत्ता

घोडपदेवच्या रामभाऊ भोगले मार्गावरील हरूशिंग सोबराज चाळीत राहणारे भिकाजी पानसरे (७५) हे पूर्वी इलेक्ट्रीशनचे काम करायचे. मात्र, वाढत्या वयामुळे आणि थरथरत्या हातामुळं काम सुटलं. पदरात चार मुली होत्या. त्यापैकी तिघांची लग्न झाली. कालांतराने शरीर साथ देत नसल्यामुळं त्यांना स्मृतीभंश हा आजार झाला. अशातच पानसरे फेब्रुवारी महिन्यात घराबाहेर पडले आणि बेपत्ता झाले. घरातल्यांनी त्यांचा खूप शोध घेतला. सोशल मिडियावरही पानसरे यांच्याबद्दल माहिती अपलोड केली. त्याद्वारे पानसरे यांच्याबद्दल मिळणाऱ्या माहितीवरून त्यांचे कुटुंबीय शोध घेत कधी मुंबईबाहेर तर कधी राज्याबाहेरही जायचे. मात्र, पदरात कायम निराशाच पडायची. पण कुटुंबियांचे प्रयत्न थांबलेले नव्हते. 


व्हायरल व्हिडीओने लागला शोध

काही दिवसांपासून व्हाॅट्स अॅप आणि सोशल मिडियावर एक पोलिस रस्त्यात बसून असलेल्या आजोबांना जेवण देत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओतील पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचं अनेकांनी कौतुक केलं. रविवारी हा व्हिडीओ दुपारी अडीचच्या सुमारास शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे शिपाई अशोक भुजबळ यांच्या व्हाॅट्सअॅप ग्रुपवर आला. व्हिडीओ निरखून पाहिला असता आपल्या शेजारी राहणारे बेपत्ता पानसरे आजोबांचा तो असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, खात्री करण्यासाठी कामावरून सुटल्यावर भुजबळ हे पानसरे यांच्या घरी गेले.

 भुजबळांनी तो व्हिडीओ पानसरे यांची मुलगी संगीता हिला सायंकाळी ६.३० वा. दाखवला. वडिलांची ओळख पटताच संगिताला तिचे अश्रू अनावर झाले आणि ती जागीच कोसळली. त्यानंतर भुजबळांनी सर्व ग्रुपवर तो व्हिडीओ आणि पानसरे यांच्याबद्दलची माहिती ७ वाजता व्हायरल केली. त्यावेळी भुजबळ यांचे सहकारी पोलिस अंमलदार संतोष वाघमोडे यांनी व्हिडीओतील जागा आमच्या गावची म्हणजेच सोलापूरची असल्याचा मेसेज रात्री ८ वाजता केला.हेड काॅन्स्टेबलची माणुसकी

भुजबळांनी संपूर्ण हकीकत संतोष यांना सांगितल्यानंतर संतोष यांनी त्यांच्या गावच्या व्हाॅट्स अॅप ग्रुपवर पानसरे आजोबांची माहिती टाकत. जेवण देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा नंबर मागितला. त्यावेळी पानसरे यांना जेवण देणारे ते पोलिस हेड काॅन्स्टेबल नसीरउद्दीन शेख सोलापूर शहरातील असल्याचं कळालं. शेख यांचा नंबर मिळाल्यानंतर ८.३० वा. अशोक भुजबळ यांनी शेख यांच्याशी संपर्क साधून त्यांना पानसरे यांच्या विषयी माहिती दिली. वेळ न दवडताच नसीरउद्दीन शेख सोलापूर शहरात पानसरे यांच्या शोधासाठी बाहेर पडले. त्यावेळी सिद्धेश्वर मंदीरासमोरील कापड बाजार चौकीजवळ पानसरे रस्त्याच्या आडोशाला बसल्याचं शेख यांच्या निदर्शनास आल्यानंतर शेख यांनी पानसरे यांना पोलिस चौकीत आणले.


सहा महिन्यांनी शोध

मुंबईतून पानसरे कुटुंबिय भिकाजी पानसरे यांना आणण्यासाठी सोमवारी रात्री गेले. मंगळवारी सकाळी पानसरे कुटुंबियांनी भिकाजी पानसरे यांना ताब्यात घेत, शेख यांचे आभार मानले. विशेष म्हणजे मागील अनेक दिवसांपासून शेख हे पानसरे यांना जेवण देत त्यांची काळजी घेत होते. वडिलांची अवस्था पानसरे कुटुंबियांना पहावत नव्हती. मात्र, बेपत्ता वडिलांना सहा महिन्यांनी पुन्हा पाहून पानसरे कुटुंबियांना भरून आलं.बेपत्ता वडिलांचा शोध घेण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. मात्र व्हायरल झालेला वडिलांचा तो व्हिडीओ आणि सतर्क अशोक भुजबळ यांच्यामुळे आज बाबा आम्हाला पुन्हा मिळाले. सोलापूरचे हेड काॅन्स्टेबल नसीरउद्दीन शेख आणि भुजबळ यांचे आभार मानावे तितके कमीच आहे. - संगीता पानसरेहेही वाचा -

सलमान खानला भेटण्यासाठी गाठली मुंबई

मेट्रोच्या खड्ड्यात पडून मुलीचा मृत्यू 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा