वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

 Dharavi
वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

धारावी - पश्चिमेकडील माहीम फाटक येथील जस्मिन रोडवरील आझादनगर परिसरात एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली. या हल्ल्यात शफिक खान (60) हे जागीच ठार झाले असून, त्यांची पत्नी हलीमुनीसा खान (55) गंभीररीत्या जखमी झाली आहे.

पहाटे जॉगिंगवरून घरी परतलेल्या शेजाऱ्याला हलीमुनीसा खान हिच्या विव्हळण्याचा आवाज आल्याने त्याने दरवाजाच्या फटीतून पाहिले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पहाटेच्या वेळेत गल्लीतील आरडाओरड ऐकून घराच्या माळ्यावर झोपणारी दाम्पत्याची मुलगी जागी झाली आणि घरातील दृश्य पाहून हबकली. तिने शेजाऱ्यांच्या मदतीने तात्काळ आपल्या आई-वडिलांना शीव रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी शफिकचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आणि त्याच्या पत्नीला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शाहूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून डॉग पथकाला घटनास्थळी बोलावले. या घटनेबाबत शाहूनगर पोलिसांनी गुप्तता पाळली असून, ते सराईत खुन्याचा शोध घेत आहेत.

Loading Comments