मराठी अभिनेत्रीकडेही सिद्धार्थ सरोदेने मागितली खंडणी

तरुणींना पैशांसाठी ब्लॅकमेल करायचा. पैसे न दिल्यास सोशल मिडियावर ते फोटो प्रसिद्ध करण्याची धमकी द्यायचा. अशा प्रकारे सरोदेने वांद्रेतील एका माॅडेलसह आठ जणींना फसवल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी त्याच्यावर वर्सोवा, नवघर आणि ठाण्याच्या विष्णूनगर पोलिस ठाण्यात तीन तरुणींनी गुन्ह्यांची नोंद केली आहे.

मराठी अभिनेत्रीकडेही सिद्धार्थ सरोदेने मागितली खंडणी
SHARES

कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगून तरुणींशी जवळीकता साधत, त्यांचे फोटो माॅर्फ करून तरुणींकडे खंडणी मागणाऱ्या सिद्धार्थ सरोदेच्या काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. त्याने अशा प्रकारे आठ जणींकडे खंडणी मागितल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले आहे. त्यात एका मराठी अभिनेत्रीचाही समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  


अश्लील फोटो बनवायचा

चेंबूरचा रहिवाशी असलेला सरोदे हा फेसबुक आणि इतर सोशल मिडियाच्या माध्यमातून माॅडेलशी संपर्क साधायचा. त्यावेळी तो स्वतःची ओळख कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगायचा. तरुणींना टीव्ही मालिका, चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी देतो, असे सांगून तो महिलांचा विश्वास संपादन करत असे. चित्रपटात काम करता येईल, या आशेने मोठ्या संख्येने तरुणी त्याच्या संपर्कात आल्या होत्या. अनेक तरुणी त्याला चित्रपटात काम मिळावे म्हणून स्वतःच्या माॅडलिंगचे फोटोही पाठवायच्या. तरुणींचे हेच फोटो ‘पिक कॅड’ अँपद्वारे माॅर्फ करून तो अश्लील फोटो बनवायचा.

त्यानंतर तो तरुणींना पैशांसाठी ब्लॅकमेल करायचा. पैसे न दिल्यास सोशल मिडियावर ते फोटो प्रसिद्ध करण्याची धमकी द्यायचा.  अशा प्रकारे सरोदेने वांद्रेतील एका माॅडेलसह आठ जणींना फसवल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी त्याच्यावर वर्सोवा, नवघर आणि ठाण्याच्या विष्णूनगर पोलिस ठाण्यात तीन तरुणींनी गुन्ह्यांची नोंद केली आहे. तर उर्वरित तरुणी बदनामी होईल या उद्देशाने तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 


बाँम्बस्फोटाची अफवा पसरवली

सरोदे याने २०१७ मध्ये बोरिवली रेल्वे स्थानकावर बाँबस्फोट घडवण्याची अफवा पसरवली होती. त्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक करत त्याची रवानगी भायखळाच्या आर्थर रोड जेलमध्ये केली. त्या ठिकाणी एक आरोपी अशाच प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. त्याच्याकडून माहिती मिळवत सरोदेने जामीनावर बाहेर आल्यानंतर तरुणींना जाळ्यात ओढत खंडणी उकळण्यास सुरूवात केल्याचे सांगितले. नवघर परिसरातील तरुणींकडून त्याने २५ हजार, वर्सोवा येथील माॅडेलकडून १ लाख आणि ठाण्यातील तरुणीकडून २५ हजार उकळल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तर उर्वरित पाच तरुणींशी पोलिसांनी संपर्क साधला असता त्या तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यात पाच तरुणींमध्ये चेंबूर परिसरात राहणाऱ्या एका मराठी अभिनेत्रीचाही समावेश असल्याचे समजते. 



हेही वाचा -

भांडणात मध्यस्थी केल्याने शेजाऱ्याचं घर पेटवलं

नेस वाडियाला जपानमध्ये २ वर्षांची शिक्षा, अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा