दहावी पेपरफुटी: मुंब्य्रातून शिक्षकाला अटक
त्याला हा पेपर मुख्य परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक असणाऱ्या प्रशांत परशुराम धोत्रे यांनी पाठवल्याचं पुढं आल्यावर पोलिस त्यांच्या शोधात होते. सोमवारी मुंब्रा परिसरातून एन्कान्टर स्पेशलिस्ट दया नाईक यांच्या पथकाने प्रशांतला अटक केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
शहरात नुकत्याच संपलेल्या दहावी पेपरफुटी प्रकरणात अंबोली पोलिसांनी आणखी एका शिक्षकाला सोमवारी मुंब्रा परिसरातून अटक केली. प्रशांत परशुराम धोत्रे असं या शिक्षकाचं नाव आहे. किड्स पॅरेडाइज परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक असलेल्या धोत्रे यांनी हे पेपर सोशल मीडियावर फोडल्याचं तपासात पुढं आलं आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईच्या अंबोली पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या एम.व्ही.एम स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये १९ तारखेला इंग्रजीचा पेपर फुटला. त्यावेळी अंबोली पोलिसांनी संबधित विद्यार्थ्यांना ताब्यात घेत तिघांना अटक केली होती. या आरोपींकडून त्यावेळी पोलिसांनी ११ मोबाइल हस्तगत केले होते.
'अशी' झाली धरपकड
या तिघांनी ८ विद्यार्थ्यांना व्हाॅट्स अॅपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या. तपासाअंती पोलिसांनी मुंब्य्रातील शिक्षक फिरोज खानला अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने प्रश्नपत्रिका बदलापूरमधील शिक्षक रोहित अमुलराज सिंग याला दिल्याचं कबूल केलं. ज्या ब्रिलियंट क्लासमधून पेपर फुटले होते, त्या क्लासमध्ये रोहित विद्यार्थ्यांची शिकवणी घ्यायचा. फिरोजकडून मिळालेल्या प्रश्नपत्रिकेद्वारे त्याने विद्यार्थ्यांकडून उजळणी करून घेतली होती. शिवाय त्याने ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना व्हाॅट्अॅपद्वारे पाठवली.
पर्यवेक्षकाने पेपर फोडला
फिरोजला मुंब्य्रातील किड्स पॅरेडाईज शाळेने एका परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक पाठवलं होतं. त्यावेळी त्याने हा पेपर फोडल्याचा संशय सर्वांना होता. मात्र फिरोजच्या चौकशीत त्याला हा पेपर मुख्य परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक असणाऱ्या प्रशांत परशुराम धोत्रे यांनी पाठवल्याचं पुढं आल्यावर पोलिस त्यांच्या शोधात होते.
दरम्यान सोमवारी मुंब्रा परिसरातून एन्कान्टर स्पेशलिस्ट दया नाईक यांच्या पथकाने प्रशांतला अटक केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.