दोन भामट्यांनी दाखल केले खोटे दावे, एसटीला करोडोंचा चुना?


दोन भामट्यांनी दाखल केले खोटे दावे, एसटीला करोडोंचा चुना?
SHARES

एसटी महामंडळाने कोट्यवधींचे बोगस दावे दाखल केल्याप्रकरणी वकील आणि डॉक्टरच्या दुकडी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वकील यु. आर. विश्वकर्मा आणि डॉक्टर मिहीर अविनाश रननवरे या दोघांनी मिळून एसटी प्रवासात जखमी झालेल्या प्रवाशांना पैशांच आमिष दाखवून बनावट कागदपत्रे तयार करून एसटी विरोधात तब्बल १ कोटी २४ लाखांचे दावे दाखल केल्याचं राज्य परिवहन मंडळाने म्हटलं आहे. या दोघांविरोधात एसटीने ठाणे नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


कशी झाली फसवणूक?

२३ मार्च २०१६ ला शहापूर - जुनावली गाडीला मुरबीचा पाडा येथे अपघात झाला, ज्यात एका प्रवाशाचा मृत्यू, तर ३० प्रवासी जखमी झाले होते. कालांतराने यातील २७ जखमी प्रवाशांनी मोटार अपघात न्याय प्राधिकरणाकडे १ कोटी १६ लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. या प्रकरणाची चौकशी करत असताना जोडण्यात आलेले ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचे डिस्चार्ज कार्ड आणि खाजगी डॉक्टरांनी दिलेले डिसेबिलिटी सर्टिफिकेट बोगस असल्याचं समोर आलं. तसेच सदर प्रवाशांनी ठाणे सिव्हील हॉस्पिटलमध्ये कोणताही उपचार घेतलेला नसल्याचं देखील उघड झालं.

१२ सप्टेंबर २०१६ ला कुंदे - भिवंडी गाडीला झालेल्या अपघातात ८ प्रवाशांनी एसटी विरोधात ८ लाखांच्या नुकसान भरपाईचे दावे दाखल केले. या दाव्यांमध्ये जोडण्यात आलेली कागदपत्रे हीदेखील बोगस असल्याचं समोर आलं.


   

सुरक्षा अधिकाऱ्याचा कबुलीजबाब

हे सगळे दावे वकील असलेल्या यु. आर. विश्वकर्मा यांनी केले होते, तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट्स ही डॉक्टर मिहीर अविनाश रननवरे यांनी दिले होते. 'ज्यावेळी आम्ही जखमी प्रावाशांकडे चौकशी केली, तेव्हा यु. आर. विश्वकर्मा यांनी ७० ते ८० हजारांचं आमिष दाखवून जखमींच्या सह्या आणि डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी घेतल्याचे सांगितले आणि सगळी कागदपत्रे वकिलांनीच बनवल्याचे त्यांनी सांगितले', अशी माहिती एसटीचे मुख्य सुरक्षा दक्षता अधिकारी मनोज लोहिया यांनी दिली.  या वकिलांना डॉक्टरांनी मदत केल्याचं दिसून येत असल्याने या दोघांविरोधात आम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याचं ते म्हणाले. विशेष म्हणजे चौकशी सुरु होताच वकिलांनी ९ दावे विनाअट मागे देखील घेतले आहेत.

वर्षागणिक होणाऱ्या अपघातांमुळे एसटीला ३५ ते ४० कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागते. त्यामुळे या दोघांनी याआधी देखील अशा प्रकारचे दावे केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



हेही वाचा

म्हाडात बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा, दलाल तपस चॅटर्जीला अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा