वडाळ्यातील ट्विंकल कंपनीने केली ठेवीदारांची फसवणूक

 wadala
वडाळ्यातील ट्विंकल कंपनीने केली ठेवीदारांची फसवणूक

वडाळा - काही वर्षांतच पैसे दुप्पट करून देतो असे दाखवत वडाळ्यातील ट्विंकल एनवायरो टेक या कंपनीने ठेवीदारांची फसवणूक केली आहे. संतप्त झालेल्या ठेवीदारांनी शुक्रवारी कंपनीचे प्रवर्तक ओम गोयंका यांना घेराव घालत एकच गोंधळ घातला होता. अखेर तेथे असणार्‍या दोन पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर गोयंका यांना जाऊ देण्यात आले.

वडाळा पश्चिम येथील ग. द. आंबेडकर मार्गावरील शिल्पिन सेंटर इमारतीत बेसमेंटला ट्विंकल एनवायरो टेक या कंपनीचे कार्यालय आहे. जाळीचे कुंपण आणि त्याला कुलूप, तेथूनच कागदपत्रांची देवाणघेवाण सुरू आहे. कागदपत्रांवर केवळ शिक्के मारले जात आहे. त्यानंतर 'पुन्हा या' असे प्रत्येक आठवड्याला ठेवीदारांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे आपले पैसे बुडित खात्यात जमा झाले की काय? असे ठेवीदारांना वाटत आहे. त्यामुळे आमचे पैसे द्या, असा तगादाच त्यांच्या मागे लावला. दरम्यान या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले.

या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले आहेत, मात्र 2012 साली गुंतवलेली रक्कम अद्याप मिळलेली नाही. कंपनीने आमची फसवणूक केली असून सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी परमींदर वालिया या ठेवीदारांनी या वेळी केली.

Loading Comments