पैशाचा पाऊस झाला खोटा...भोंदूबाबाने म्हातारीला लावला ३९ लाखांचा चुना


पैशाचा पाऊस झाला खोटा...भोंदूबाबाने म्हातारीला लावला ३९ लाखांचा चुना
SHARES

अंधश्रद्धेसंदर्भात कितीही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आजही अनेक लोक अंधश्रद्धेच्या घटनांना बळी पडताना दिसतात. सुशिक्षित आणि प्रगतशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसारख्या शहरातसुद्धा एका ८२ वर्षीय वृद्ध महिलेची एका भोंदूबाबानं लाखो रुपयांची फसवणूक केलीय. भोंदू बाबा कडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. मात्र यावेळी वृद्ध कडचे सगळे पैसे आणि दागिने संपले त्यावेळी तिने मुलींकडे पैशांची मागणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

हेही वाचाः- मनसेचं गावपातळीवर उल्लेखनीय यश, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबईतल्या नागपाडा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या ८२ वर्षीय वृद्ध महिलेची २०१९ मध्ये एका धार्मिक कार्यक्रमा दरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर या भामट्यांनी वयोवृद्ध महिलेला पैशांचे आमीष दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं. मागील दोन वर्षांपासून या भोंदू बाबांनी वेळोवेळी फसवणूक करत होते. हनिफ मोहम्मद शेख (३०) इम्रान मोहम्मद सय्यद (२८) असे या भोंदूबाबांची नावे आहेत.  हे दोघेही मालाडच्या मालवणी परिसरातली राहणारे आहेत.  भोंदूबाबानं वारंवार महिलेकडून पैसे आणि दागिन्यांची मागणी करत पैशांचा पाऊस पाडून देतो असं आमिष दाखवलं होतं. पैशांचा पाऊस पाहण्याच्या नादात त्या महिलेने तिच्याकडेचे सगळे दागिने विकून पैसा जमा केला आणि ते पैसे या भोंदू बाबाला देऊ केले. मात्र पैशाची भूक न मिटलेल्या या भोंदूबाबाकडून वारंवार पैशांची मागणी होत होती. गेल्या दोन वर्षात या भोंदूबाबाने या वृद्ध महिलेकडून तब्बल ३९ लाखांचा मुद्देमाल घेतल्याच तपासामध्ये उघडकीस आलय.

हेही वाचाः- IPL 2021: मुंबई इंडियन्सचा मलिंगासह 'या' खेळाडूंना सोडचिठ्ठी

समाजात आजही पैशांचा पाऊस पाडता येतो शिवाय मंत्र-तंत्र करून एखाद्याचा आजार बरा केला जातो. अशा प्रथा प्रचलित आहेत.खेड्यापाड्यात अश्या प्रकारांना अनेक लोक बळी पडतात मात्र मुंबईसारख्या स्मार्ट सिटी अशी ओळख असणाऱ्या शहरांमध्ये उच्चभ्रू वसाहतीत राहणार्‍या एका महिलेची अशा पद्धतीने फसवणूक होऊ शकते यावर कदाचित तुम्हाला सहजासहजी विश्वास बसणार नाही पण हे खर आहे. आरोपी भोंदूबाबने या महिलेला तिच्यात घरात अंधार करून मंत्र तंत्राचा वापर करून खोट्या नोटांचा पाऊस पाडून दाखवला होता. तसेच त्या खोट्या नोटा तिच्याच कपाटात ठेवून त्याची माहिती कुणाला न देण्याचे सांगितले. तसे केल्यास तिचे नुकसान होईल, तिच्या मुलींच्या आयुष्यात अनेक विघ्न येतील अशी भिती दाखवली होती. महिलेकडचे सर्व पैसे संपल्यानंतर ही आणखी पैसे हवे असल्यास ५ लाख द्यावे लागतील अशी मागणी केली होती मात्र वेळीच पीडित महिलेच्या मुलीने या सगळ्याची माहिती घेतली असता पैशांचा पाऊस म्हणून पाडलेल्या नोटा लहान मुलांच्या खेळण्यातील असल्याचं समोर आल्याने या भोंदूबाबाचा भांडाफोड झाला.

हेही वाचाः- संभाजी बिडीचं नाव बदललं, आता या नावानं ओळखली जाणार बिडी

डोळ्यावर अंधश्रद्धेचा पडदा बसल्यास आपल्या हातून नक्की काय होतंय हे लक्षात येत नाही अगदी तसच या वृद्ध महिलेच्या बाबतीत घडलय. पोलिसांनी आरोपीविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केलीय पण असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडूनही अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केलं जातंय. अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या अनेक वर्षांपासून समाजातून अंधश्रद्धा पूर्णपणे नाहीशी व्हावी यासाठी प्रयत्न करतेय पण तरीही लोकांमधून अंधश्रद्धा पूर्णपणे नाहीशी करण्यात आजही यश आलेले नाहीये त्यातच मुंबईसारख्या शहरात असे प्रकार घडू लागल्याने खळबळ माजलीय. पैशांचा पाऊस पाडणे, मंत्रतंत्राचा वापर करून एखाद्याला बर करणे हे समाजातील थोतांड असून लोकांनी याला बळी पडू नये असं वारंवार म्हटलं जातं मात्र फसवणुकीच्या अश्या घटना पाहता लोक या गोष्टीला कधी मनावर घेणार याच उत्तर मात्र आजही गुलदस्त्यात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा