पवईमध्ये दोन चिमुरड्यांवर बलात्कार, एकाची विष पिऊन आत्महत्या

  Powai
  पवईमध्ये दोन चिमुरड्यांवर बलात्कार, एकाची विष पिऊन आत्महत्या
  मुंबई  -  

  मुंबईच्या पवई परिसरात दोन लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 आणि 11 वर्षांच्या या दोन मुलांवर एका अज्ञात इसमाने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पहिल्या मुलाच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केली आहे. या दोघांनीही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र पहिला मुलगा सुदैवाने यातून वाचला असून दुसऱ्या मुलाचा मात्र दुर्दैवी मृत्यू ओढवल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. पोलिस पहिल्या मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आरोपीचा शोध घेत आहेत.

  ही दोन्ही मुले पवईत शेजारी शेजारी रहातात. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार 12 वर्षांचा हा मुलगा गेल्या चार ते पाच दिवसांपासून शांत होता. त्याच्या शाळेतल्या शिक्षकांनीही पालकांना त्याबद्दल सांगितले होते. शिवाय 'आपल्याला कुठेच जायचं नाही' असंही हा मुलगा बोलत होता. अचानक मुलाला उलट्यांचा त्रास सुरु झाल्यामुळे त्याला सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता त्याने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं.

  मुलाने रूग्णालयात त्याच्या आईला झालेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. मुलाने सांगितल्यानुसार काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती त्याला फिल्टर पाडा परिसरातल्या एका खोलीत घेऊन गेला आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्या इसमाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही मुलाने सांगितल्याचं मुलाच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबबात सांगितले.

  मुलाच्या वडिलांनी याबाबत अधित धक्कादायक खुलासा केला आहे. "माझ्या मुलाप्रमाणेच शेजारी रहाणाऱ्या 11 वर्षांच्या मुलासोबतही असाच प्रकार घडला आहे. त्या मुलानेही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या वडिलांनी मात्र डिहायड्रेशनमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना सांगितलं आहे" असे पहिल्या मुलाच्या वडिलांनी सांगितले आहे.

  दरम्यान, या प्रकरणी संबंधित मुलाच्या जबाबावरुन आम्ही पोक्सो आणि अनैसर्गिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती झोन दहाचे डीसीपी नवीन कुमार रेड्डी यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.  हेही वाचा

  मुंबईत आयएएस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या

  आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.