विरारमध्ये पालिकेच्या तोडक कारवाईदरम्यान महिलेचा गर्भपात


विरारमध्ये पालिकेच्या तोडक कारवाईदरम्यान महिलेचा गर्भपात
SHARES

विरारमध्ये पालिकेच्या तोडक कारवाईदरम्यान एका गर्भवती महिलेला धक्काबुक्की झाल्याने तिचा गर्भपात झाला आहे. पीडित महिला अलीशा उत्तेकर ही विरार (पू.) येथील नारी प्रतिष्ठान शिलाई केंद्रात दुपारी दोन वाजताच्या दरम्यान विश्रांती घेत असताना ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अलीशा उत्तेकर विश्रांती घेत असताना वसई-विरार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्मिता भोईर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी शिलाई केंद्रावर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पीडित महिलेला अचानक जाग आल्यानंतर ती धावत आली आणि ही तोडक कारवाई का केली जात असल्याचे विचारत ती थांबवावी अशी मागणी महिला अधिकाऱ्याकडे केली. पण स्मिता यांनी महिलेला धक्का देत तोडक कारवाई सुरुच ठेवली. त्यावेळी अलिशा जागेवरच कोसळली. तिच्या पोटाला देखील मार बसला. हे पाहताच इतर महिलांनी तिला रुग्णालयात नेले. तेव्हा तिचा गर्भपात झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात पोहचल्यानंतरही विरार पोलीस पीडित महिलेचा जबाब घेण्यासाठी आलेच नाही. महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेनंतर त्यांनी विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युनुस खान यांच्याकडे तक्रार केली होती. पण त्यानंतरही पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

या घटनेमुळे अागरी सेना पालघरचे अध्यक्ष जनार्दन पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर पोलिसांनी महिलेला न्याय दिला नाही तर आगरी सेना बेमुदत उपोषणाला बसेल असा इशाराही त्यांनी दिला. सरकार एकीकडे महिलांना प्रशिक्षण देण्यावर भर देत असताना दुसरीकडे मात्र महिलांना दिले जाणारे मोफत प्रशिक्षण केंद्रावरच तोडक कारवाई करून महिलांचा अपमान करत असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी देखील आपले हात झटकले आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.

विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस खान यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षण केंद्राच्या तोडक कारवाईदरम्यान पोलीस तिथे उपस्थित नव्हते. पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी विना पोलीस बंदोबस्त ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान व्हिडिओ देखील रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यावरून कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

महिला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे महिलेचा गर्भपात झाला असून महिलेची प्रकृती स्थिर आहे. महिलाचा जबाब घेण्यासाठी अजूपर्यंत पोलीस आलेच नाहीत. पण डॉक्टरांनी महिलेच्या कुटुंबियांना याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यास सांगितले. पीडित महिलेचे कुटुंबिय आणि इतरांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार केल्यानंतर आता पोलिसांचे डोळे उघडले असल्याचे बोलले जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा