खऱ्याखुऱ्या स्पेशल 26ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Ulhasnagar
खऱ्याखुऱ्या स्पेशल 26ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
खऱ्याखुऱ्या स्पेशल 26ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
See all
मुंबई  -  

अक्षय कुमारचा स्पेशल 26 हा सिनेमा तुम्हाला माहीत असेलच. त्याचप्रमाणे विक्री कर अधिकाऱ्याचा बनाव करत धाड टाकण्यासाठी आलेल्या पाच भामट्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी बेड्या ठोकल्या. उल्हासनगरच्या शांतीनगर भागातील एका दुकानात हे सगळे तोतया अधिकारी धाड टाकण्यासाठी आले होते. त्यादरम्यान दुकान मालकाला संशय आल्याने त्यांनी स्थानिकांच्या मदतीने या सगळ्यांना पकडले आणि मध्यवर्ती पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर या सगळ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

कॅम्प-3 भागातील शांतीनगर परिसरात एका दुकानात दुपारी साडेबाराच्या सुमारास तिघे जण नकली विक्रीकर अधिकारी बनून आले आणि त्यांनी कागदपत्रांची मागणी केली. यावेळी इतर दोघे बाहेर गाडीत बसले होते. मात्र या सर्वांच्या एकंदरीत वर्तणुकीवरून हे भामटे असावेत असा संशय दुकानमालक श्रीचंद नागदेव यांना आला आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून या सगळ्यांना पकडून ठेवले. तसेच पोलिसांना पाचारण करून या सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी या सगळ्यांना खाक्या दाखवताच त्यांनी आपण बोगस अधिकारी बनून धाड मारण्यासाठी आल्याची कबुली दिली. त्यानुसार या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी इतर कुठे असे प्रकार केले आहेत का? याचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांनी दिली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.